पाणी व चाराटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्याच्या हेतूने महापालिकेच्या वतीने १४ व १५ मे रोजी ‘पेटते पाणी’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह हे मार्गदर्शन करणार आहेत.
वाढते तापमान आणि घटते पर्जन्यमान ही नैसर्गिक आपत्ती आहे की, मानवनिर्मित संकट याची चर्चा सध्या विविध पातळींवर सुरू आहे. या समस्येच्या निराकरणात तसेच त्यासाठीच्या उपाययोजनांच्या चर्चेत समाजातील विविध घटकांचा सहभाग असणे गरजेचे आहे. हे जाणून महापालिकेच्या वतीने या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर किशोर पाटील यांनी दिली. १४ मे रोजी परिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या सत्रात जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह हे ‘२१व्या शतकातील दुसऱ्या दशकात नद्यांच्या पुनर्जीवनाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुसऱ्या सत्रात ‘शहरातील पाणी प्रश्न आणि उत्तरांचा शोध’ या विषयावर जलस्रोत अभ्यासक व पुनर्भरण विषयक तज्ज्ञसंध्या एदलाबादकर मार्गदर्शन करतील. तिसऱ्या सत्रात ‘औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याच्या पुनर्वापराचा आदर्श’ औरंगाबादच्या बजाज अॅटो यांचा स्लाइड शो होईल.
दुसऱ्या दिवसी पहिल्या सत्रात ‘पाणीसाठा नियोजन आणि लोकसहभाग’ या विषयावर समान पाणीवाटप चळवळीचे नेते भरत कावळे (ओझर) हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘औद्योगिक क्षेत्रातील पाणी प्रश्न खासगीकरण आणि पर्याय’ व ‘पाणलोट क्षेत्र विकास प्रयोग अनुभव’ यावर मुंब़ईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रांजल दीक्षित व अमळनेरच्या राष्ट्रीय विकास संस्थेचे भूपेंद्र महाले हे माहिती देतील. समारोपाच्या सत्रात जलस्रोत विकासाचे विविध उपाय, महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रयोग आणि फलनिष्पत्ती या विषयांवर ‘बायफ’ संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेती व औद्योगिक वापरासाठी होतो. त्यामुळे सर्व घटकांना योग्य न्याय देण्याचा विचार रुजविणे, जलस्रोतांचे जतन करण्याची गरज आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी पुनर्भरणाचे विविध उपाय जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, पाणी संकट दूर करण्यासाठी जनतेत कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करणे, लोक सहभागातून पाणी प्रश्न सोडविणे हेच आपले ध्येय असल्याचे महापौर पाटील यांनी म्हटले आहे. या परिषदेचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
जळगावमध्ये ‘पेटते पाणी’ परिषद
पाणी व चाराटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्याच्या हेतूने महापालिकेच्या वतीने १४ व १५ मे रोजी ‘पेटते पाणी’ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह हे मार्गदर्शन करणार आहेत.
First published on: 09-05-2013 at 03:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burning water conference in jalgaon