सोलापूर : जिल्हा्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण ३५ प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अक्कलकोट येथील रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांनादेखील पाचरण करण्यात आले. सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून च्याचे नेमके कारण अद्याप समोर नाही.

या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे, अशा ठराविक किंवा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

याआधी मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार या जिल्ह्यांच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही बस महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील अमळनेर आगाराची होती. यातील बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी होते. या अपघातानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली होती.

Story img Loader