नाशिक परिसरात भाजीपाला व फळांचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होत असल्याने प्रक्रिया उद्योगास अधिक वाव असल्याचा सूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवातील चर्चासत्रातून व्यक्त झाला. या महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. ‘प्रक्रिया उद्योग’ या विषयावरील चर्चासत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अन्न व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थान कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी भूषविले.
डॉ. गायकवाड यांनी बचत गटातील महिलांनी प्रक्रिया उद्योगावर आधारित स्वयंरोजगार उभारण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या कृषी मालावर प्रक्रिया केल्यास कमी खर्चात कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो. बाजारात एकाच वेळी कृषी माल मोठय़ा प्रमाणात विक्रीस आला तर उत्पादनाची किंमत कमी होऊन नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी नाशवंत उत्पादनावर प्रक्रिया करून त्याला टिकाऊ स्वरूपात बाजारात आणल्यास उत्पादनास नक्कीच चांगली किंमत मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी प्रक्रिया उद्योगास प्रचंड वाव असल्याचे स्पष्ट करताना केंद्र दरवर्षी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले. केंद्राने बचत गटातील महिलांना प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षित महिलांनी स्थानिक पातळीवर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून ते राज्य, राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. जवळपास १७ प्रकारच्या प्रक्रियायुक्त पदार्थाचे मुक्त विद्यापीठात प्रशिक्षण दिले जात असून बचत गटाच्या महिलांना अशा प्रकारचे प्रशिक्षण हवे असल्यास केंद्रामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रकाश झांबरे यांनी ‘जनावरांची आनुवंशिक सुधारणा’, पशुसंवर्धन सहाय्यक उपआयुक्तांनी ‘निकृष्ट चारा सकस करणे व दुष्काळी परिस्थितीतील चाऱ्याचे नियोजन’, श्याम कडूस यांनी ‘दुग्ध व्यवसायाची वाटचाल व व्यवस्थापन’, प्रा. हेमराज राजपूत यांनी ‘प्रक्रिया उद्योग-संधी व वाव’ तर प्रा. अर्चना देशमुख यांनी ‘भरधान्य प्रक्रिया’ या विषयावर मार्गदर्शन दिले. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक, दिंडोरी व निफाड येथील शेतकरी महिलांची उपस्थिती महोत्सवात लक्षणीय ठरली. सूत्रसंचालन डॉ. नितीन ठोके यांनी केल. डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा