महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. अलिबागमधील उद्योजक महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री जोगळेकर नाका इथे सुरू करण्यात आली आहे. पुढील तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.दिवाळी सणाचे औचित्य साधून अलिबागमधील होतकरू आणि तरुण महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान जोगळेकर नाका इथे या मेळाव्याचे आयोजन अलिबाग नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने केल आहे. डॉ. मेघा घाटे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील छोटय़ा महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख लोकांना व्हावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे नगराध्यक्षा नमिता नाईक आणि उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह यांनी सांगितले.    या मेळाव्यात शहरातील ४० महिला उद्योजकांनी सहभाग घेतला असून यात शोभेच्या वस्तू, टाकाऊ पदार्थापासून बनवलेल्या टिकाऊ वस्तू, आकाशकंदील, आकर्षक पणत्या, रंगीबेरंगी मेणबत्त्या, रेडीमेड रांगोळ्या, फराळाचे पदार्थ, कपडे यांसारख्या वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. अंध महिलांनी तयार केलेल्या वस्तू ग्राहकांच्या विशेष पसंतीला उतरत आहेत.