सांगली : कोठडीची धमकी देत सांगलीतील एका व्यापाऱ्याला सव्वादोन कोटी रुपयांना भामट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भामट्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, अभिनंदन सुभाष सुलाखे यांना अनोळखी नंबरच्या भ्रमणध्वनीवरून २६ मे ते १२ जून २०२४ या कालावधीत दोघांनी संपर्क साधला. यावेळी दोघांनी तुम्ही वापरत असलेला मोबाईल क्रमांक पुढील काही तासांत बंद होणार आहे. तुमचे आधारकार्ड ड्रग्ज व मनी लाँड्रिगमध्ये सापडले आहे. हा फार मोठा गुन्हा असून यामध्ये अटक होऊन तुरुंगात जावे लागेल. आपली मालमत्ता जप्त होऊ शकते, अशी धमकी देत हे प्रकरण मिटविण्यासाठी २ कोटी २५ लाख २ हजार १३३ रुपये उकळले. हे पैसे आयसीआयसी बँकेच्या धामणी शाखेतून वर्ग करण्यात आले. या प्रकरणी विक्रम शर्मा याच्यासह अन्य दोघा अनोळखींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.