मुंबई : प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर साताऱ्याला खासदारकी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. प्रफुल पटेल यांची २०२२ मध्ये राज्यसभेवर निवड झाली होती.
हेही वाचा >>> बीड : जातीय जाणिवा चेतवणारा प्रचार
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पटेल यांनी अजित पवार यांना साथ दिल्याने शरद पवार गटाने पटेल यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठीच पटेल यांनी अलीकडेच झालेल्या राज्यसभेच्या जागेचा मार्ग पत्करला. यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून त्यांची मुक्तता झाली. पटेल यांना २०३० पर्यंत राज्यसभेची मुदत मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रतिष्ठेची केली होती. पण उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपने ही जागा पदरात पाडून घेतली होती. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर साताऱ्याला खासदारकी देण्याचे अजित पवार यांनी सातारा दौऱ्यात जाहीर केले होते. यानुसार साताऱ्याला खासदारकी दिली जाईल, असे पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडून सातारा जिल्ह्यातील नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. नव्या खासदाराला २०२८ पर्यंत खासदारकी मिळणार आहे.