जिल्हा परिषदेच्या मिरी (पाथर्डी), कोळगाव (श्रीगोंदे) व राजूर (अकोले) या तीन गटांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या जागांसाठी दि. २८ जानेवारीला मतदान व ३० जानेवारीला मतमोजणी होईल. मात्र अद्याप कोणत्याही पक्षात उमेदवार निश्चितीसाठी हालचाल झालेली नाही.
मिरी गटातील जिल्हा परिषद सदस्य मोनिका राजळे, कोळगाव गटातील राहुल जागताप व राजूरमधील वैभव पिचड या तिघांची विधानसभेच्या निवडणुकीतून आमदारपदावर वर्णी लागली. त्यामुळे या तिघांनीही जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
तिन्ही गटांच्या पोटनिवडणुकीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि. ८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल, ती दि. १३ जानेवारीपर्यंत चालेल. दि. १४ रोजी छाननी होईल, त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. १७ पर्यंत या निर्णयासंदर्भात जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करण्याची मुदत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत, जेथे अपील दाखल नाहीत तेथे दि. १९ जानेवारीच्या दुपारी ३ पर्यंत तर जेथे अपील दाखल आहेत, तेथे २३ जानेवारीच्या दुपारी ३ पर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल व दि. २८ रोजी मतदान होईल. निवडून आलेल्या उमेदवारांची नावे ४ फेब्रुवारीला राजपत्रात प्रसिद्ध होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा