विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीदरम्यान सत्यजित तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघ प्रचंड चर्चेत होता. वर्षानुवर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या तांबे कुटुंबियांसोबतचा पक्षाचा वाद चव्हाट्यावर आला. तांत्रिक अडचणींचे कारण देत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर सहा वर्षे निलंबनाची कारवाी केली. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव करत सत्यजित तांबे यशस्वी ठरले. परंतु, अद्यापही सत्यजित तांबे आणि काँग्रेसमधील वाद मिटलेला नाही. आताही सत्यजित तांबे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा >> “उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर…”, बावनकुळेंची टीका; म्हणाले, “पोटदुखीचा आजार…”
“काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललं आहे”, असं सत्यजित तांबे म्हणाले. “काँग्रेसच्या बाहेर मला ढकललं असलं तरी माझ्या रक्तात आणि विचारांत काँग्रेस आहे. २०३० मध्ये काँग्रेसमध्ये माझ्या परिवाराला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर ही पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की मला त्यांनी बोलावलं पाहिजे. परंतु, अशी कोणतीही हालचाल अद्याप झालेली नाही”, असं सत्यजित तांबे यांनी पुढे स्पष्ट केलं. दरम्यान, कोणत्या लोकांनी टार्गेट केलं, याबाबत त्यांचा कोणावर रोख आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
“माझे काँग्रेसच्या वरिष्ठांशी मतभेद झाले नाहीत. तसेच, कोणाशी मतभेद असण्याचं कारणही नाही. निवडणुकीच्या काळात घडलेल्या घटनांबद्दल अनेक माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. तेव्हा काही ठराविक लोकांनी गैरसमज निर्माण केलं. त्यातून पक्षाने माझ्यावर कारवाई केली”, असंही सत्यजित तांबे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
हेही वाचा >> “अजित पवार आमचे नेते”, या शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं?
“एच. के. पाटील यांच्याशी आमच्याशी चर्चा झाली होती. ए. बी. फॉर्म कुणाला द्यायचा नाही. माझं नावच काँग्रेसचा उमेदवार म्हणून येणार होतं. शेवटच्या क्षणी ते जाहीर करायचं हे ठरलं होतं. बाळासाहेब थोरात यांनाही याची कल्पना होती. मात्र अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी माझ्या वडिलांचं नाव दिल्लीतून जाहीर झालं. माझ्याशी बोलणं झालं होतं त्या प्रमाणे एच. के. पाटील यांनी माझं नाव असावं यासाठी खूप चर्चा केल्या, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र काहीही झालं नाही. पुढे एबी फॉर्मही चुकीचा आला त्यानंतर काय घडलं ते माहित आहेच. मला थेट निलंबन करण्याचं पत्र पाठवण्यात आलं. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने मला बोलण्याची, स्पष्टीकरण देण्याची संधी दिली गेली नाही. हे सगळं का घडलं तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठांना विचारा असं का घडलं?” असं स्पष्टीकरण सत्यजित तांबे यांनी फेब्रुवारी महिन्यांत दिलं होतं.