नेवासे तालुक्यातील सोनई परिसरातील दलितांच्या तिहेरी हत्याकांडाचा तपास सीआयडीकडून काढून घेऊन पुन्हा पोलिसांकडे सोपविण्याची गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केलेली घोषणा हवेतच विरली आहे. घोषणा करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी अद्याप अशा प्रकारचे आदेश नगरचे पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना मिळालेले नाहीत.
दलित हत्याकांडाचा तपास नगर पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही तपास न करता पूर्वी पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हत्याकांडाचा हेतू नेमका काय होता, हे सीआयडीच्या तपासात निष्पन्न झाले नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर गृहमंत्री पाटील यांनी गुन्ह्य़ाचा तपास पुन्हा पोलिसांकडे सोपविण्याची घोषणा विधिमंडळात कधी केली हे कोडे पोलिसांनाही पडले आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेले निवेदन अंगाशी येण्याची शक्यता असल्याने आता तपास बदलण्याचा आदेशही पाटील यांनी काढलेला नाही.
सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे जानेवारी महिन्यात संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६), सचिन घारू (वय २३) या दलित मेहतर समाजातील तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. धनवार व कंडारे यांचा खून करून मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरडय़ा विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय अडकित्त्याने तोडण्यात आले. तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना हत्याकांडप्रकरणी अटक केली. हत्याकांडात घरातील महिलांचा समावेश असूनही अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. पोलिसांनी फिर्याद न देता मुकेश चांगरे या तरुणाची फिर्याद घेण्यात आली. हत्येचा हेतू काय होता याचा उल्लेख फिर्यादीत जाणीवपूर्वक टाळण्यात आला. ते कारण टाळण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप होत आहे. हत्याकांडाच्या तपासाचा पुरता खेळखंडोबा करण्यात आला आहे. सचिन घारू याच्या छातीवर मुलीचे नाव कोरलेले होते. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करताना उल्लेख करण्यात आलेला नाही. मृत तरुणांच्या कुटुंबीयांचे जबाब वेळेवर घेण्यात आलेले नाहीत. तसेच कूपनलिकेत टाकलेल्या घारू याच्या हातापायांचा शोधही घेण्यात आलेला नाही.
सोनई भागातील एका प्रभावशाली नेत्याच्या पुतण्याने एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने हत्याकांडाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला होता. तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पुतण्याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. पण, नंतर चौकशी टाळण्यात आली. हत्याकांडानंतर आरोपींनी या पुतण्याशी संपर्क केला होता. त्याने पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून मांडवली केली, असा आरोप केला जातो. पोलिस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यांना तपासात प्रगती करता आली नाही. त्यानंतर सीआयडीकडे तपास सोपवला गेला. सीआयडीने गांगुर्डे यांनी अर्धवट केलेल्या तपासाच्या आधारेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दलित संघटनांनी आवाज उठवूनही काहीही झाले नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही सीआयडीकडून तपास काढून तो पोलिसांकडे सोपवण्याची घोषणा केली. पण तसे अजूनही घडलेले नाही. हत्याकांडात मारला गेलेला सचिन घारू या तरुणाची आई कलाबाई घारू हिने ‘पोरीसंगं प्रेम करून माझ्या पोरानं कोणता गुन्हा केला, ते दोघं लगीन करणार होते, पण सचिनला मारून टाकल.’ अशी तक्रार केली होती. पोलिसांनी तसा जबाब नोंदवला नाही.
भावाच्या मागणीने निर्णय
हत्याकांडातील दुसरा तरुण संदीप धनवार याचा भाऊ पंकज धनवार हा सैन्य दलात जवान आहे. त्याने तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्याची कैफियत सरकारने ऐकून तपास सीआयडीकडे सोपविला होता.