Torres Scam CA Abhishek Gupta : चकचकीत शोरुम्स, उंची लाईफस्टाईल असलेले कर्मचारी, ग्राहकांना आकर्षित करतील अशा सेवा आणि योजना या विविध कारणांमुळे टोरेस कंपनीने अगदी अल्पावधीत ग्राहकांच्या मनावर भुरळ घातली अन् इथेच ग्राहकांची मोठी फसगत झाली. जवळपास सव्वालाख गुंतणूकदारांनी टोरेस कंपनीत गुंतवणूक केली असून त्यांनी आता परताव्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात ज्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे त्यांनीच मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून सुरक्षेची मागणी केली आहे. टोरेस गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणात सीए अभिषेक गुप्ता यांचं नाव घेतलं जातंय. परंतु, त्यांनी आता रिट याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वकिलांनी आज माध्यमांशी संवाद साधला. अभिषेक गुप्ता निर्दोष असल्याचं ते म्हणालेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीए अभिषेक गुप्ता यांचे वकिल म्हणाले, “आम्ही रिट याचिक दाखल केली आहे. सीए अभिषेक गुप्ता यांनी टोरेस कंपनी प्रकरणातील गैरव्यवहार बाहेर काढला आहे. ते या प्रकरमातील व्हिसल ब्लोअर आहे. म्हणजे सीए अभिषेक गुप्ता यांनी आधीच येथील गैरव्यवहाराविषयी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या संरक्षणाकरता आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.”

“आज उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी आम्हाला सूचना केल्या आहेत की आर्थिक गुन्हे शाखेला पक्षकार बनवा. कारण हे प्रकरण त्यांच्याकडे आहे. हे प्रकरण आता सोमवारी लिस्ट केले गेले आहे”, अशी माहितीही वकिलांनी दिली.

हेही वाचा >> टोरेस ज्वेलरी हाऊस घोटाळा… परदेशी कंपनीकडून फसवणुकीचा नवा पॅटर्न! सव्वा लाख गुंतवणूकदारांवर पस्तावण्याची वेळ का आली?

अभिषेक गुप्तांनी आधीच तक्रार केली होती

ते पुढे म्हणाले, “सीए अभिषेक गुप्ता निर्दोष आहेत. यामध्ये युक्रेनिअन माफिया समाविष्ट आहेत. युक्रेनमध्ये बसून हे सर्व केलं जातंय. सीए अभिषेक गुप्ता यांच्याविषयी जी काही माहिती येतेय ती चुकीची आहे. माझ्या आशिलाची बदनामी केली जातेय. त्यामुळे फेक न्यूज चालवली जात आहे. मी याचिकेत सर्व पुरावे जोडले आहेत. तक्रारीचा मेल सर्वच तपास यंत्रणांना आधीच पाठवण्यात आला होता. नवी मुंबईत गैरव्यवहार सुरू असल्याचं आम्ही ऑक्टोबरमध्येच सांगितलं होतं. त्यानुसार चौकशी सुरू आहे”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ca abhishek gupta accused in torres scam case writ petition to court the lawyer said ukrainian mafia sgk