सांगली : वैद्यकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या मिरजेत परिचारिका महाविद्यालय सुरु करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कामगार तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.
मिरजेत अनेक वर्षापासून वेगवेगळ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. मागील अनेक वर्षापासून परिचारिका (नर्सिंग) महाविद्यालयाची गरज होती. वैद्यकीय सेवेसाठी लागणारे प्रशिक्षित व तज्ञ नर्स उपलब्ध होण्यासाठी येथे एक नर्सिंग कॉलेज असावे अशी मागणी अनेक वर्षापासून येथील नागरिकांची व वैद्यकीय क्षेत्राची होती. या संदर्भात पालकमंत्री डॉ. खाडे यांनी पाठपुरावा केला. आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मिरजेसह महाराष्ट्रातील सहा नर्सिंग महाविद्यालयासाठी १७३ कोटीची तरतूद करण्यास मान्यता मिळाली आहे.
या नर्सिंग महाविद्यालय स्थापनेमुळे या भागातील वैद्यकीय सेवेला आणखी गती मिळणार असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अजित पवार यांचे मंत्री डॉ. खाडे यांनी आभार मानले आहेत.