Cabinet Expansion Breaking: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांसह शिंदे गटातील काही नेत्यांनी उघडपणे टीका केली आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरल्याचं समजत आहे.
येत्या १० ते १२ दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. नवीन मंत्रिमंडळामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकी पाच नेत्यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे, असंही समजत आहे. त्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना तूर्तास पूर्णविराम मिळणार आहे.
हेही वाचा- मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मंत्र्यांची नावं आणि खाती…”
खरं तर, मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात होता. दुसरीकडे, शिंदे-फडणवीस सरकारचा केवळ दीड वर्षांचा कार्यकाल बाकी आहे. त्यामुळे नव्याने मंत्रीमंडळ विस्तार केला तर भाजपा व शिंदे गटातील अनेक आमदार नाराज होऊ शकतात, त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही, असंही बोललं जात होतं. पण येत्या १० ते १२ दिवसात शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीगाठीही वाढल्या होत्या. शेवटच्या भेटीत मंत्रीमंडळ विस्ताराबाबतचे काही विषय मार्गी लावण्यासाठी शिंदे-फडणवीसांना दिल्लीला बोलावल्याचंही पहायला मिळालं.