Maharashtra Government Portfolio Distribution: महाराष्ट्र सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहेत. तसंच छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री झाले आहेत तर धनंजय मुंडे हे कृषी मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून मिळून आता मंत्रिमंडळात २९ मंत्री असणार आहेत. आपण जाणून घेऊ कुणाला कुठलं खातं मिळालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्र्यांकडे किती खाती राहिली?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</strong> यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत.

गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा संरक्षण हे खातं देण्यात आलं आहे. दिलीप वळसे पाटील हे आता सहकार मंत्री असणार आहेत. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल, पशुसंववर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास हे खातं दिलं गेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आता वनं, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय हे खातं देण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ हे आता वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रीपद देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील हे उच्च तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रीपद देण्यात आलं आहे. गिरीश महाजन यांना ग्राम विकास आणि पंचायत राज तसंच पर्यटन खातं देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खातं होतं तेच कायम ठेवण्यात आलं आहे. दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री असतील. संजय राठोड यांना मृता आणि जलसंधारण खातं देण्यात आलं आहे.

धनंजय मुंडे यांना कृषि खातं देण्यात आलं आहे. सुरेश खाडे हे नव्या खातेवाटपानंतर कामगार मंत्री असतील. संदीपान भुमरे यांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं देण्यात आलं आहे. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत. तानाजी सावंत हे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असतील. रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री असतील. अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक विकास, औकाफ आणि पणन मंत्री असतील. दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असतील. धर्मराव बाबा अत्राम यांना अन्न आणि औषध खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अतुल सावेंकडे इतर मागास आणि बहुजन कल्याण खातं देण्यात आलं आहे. शंभूराज देसाईंना राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी आहे. आदिती तटकरे या नव्या मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री असतील. संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात आलं आहे. तसंच बंदरे खातंही दिलं गेलं आहे. मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास, उद्योजक व नाविन्यता खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल पाटील हे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन खातं देण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणकोणती खाती मिळाली?

अजित पवार यांना अर्थखातं, छगन भुजबळ हे आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातं, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य, धनंजय मुंडे हे आता कृषी मंत्री असतील, धर्मराव बाबा अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन खातं देण्यात आलं आहे. तर आदिती तटकरे या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. अनिल पाटील यांना मदत आणि पुनर्वनसन तसंच आपत्ती व्यवस्थापन खातं देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet expansion of maha government ajit pawar gets finance portfolio ncp ministers get these portfolios scj