सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राजापुरातील नाणार रिफायनरी संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जमीन अधिग्रहणासोबतच शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रलंबित मोबदला देण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. नाणार प्रकल्प नक्की होणारच, असे यावेळी चव्हाण म्हणाले. दरम्यान, शिवसेना नेते राजन साळवींसोबत झालेल्या बैठकीवर चव्हाण यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कोकणातील समस्यांसदर्भात चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भाजपा आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी चव्हाण यांनी घेतलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहील असं काही दिवसांपूर्वी साळवी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा साळवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत काही ग्रामस्थांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी येथील शेतकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला होता. राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.