केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी हे कायमच त्यांच्या किश्श्यांमुळे चर्चेत असतात. नितीन गडकरींची दिलखुलास बोलण्याची शैली आणि त्यांचं अजातशत्रू असं व्यक्तिमत्व, यामुळे नितीन गडकरींची सर्वच पक्षांमध्ये आणि समाजाच्या सर्वच वर्गांमध्ये मित्रमंडळी आहेत. आणि आपल्या भाषणांमध्ये या मित्रमंडळींसोबत घडलेले किस्से नितीन गडकरी अनेकदा सांगत असतात. बॉलिवुड शहेनशाह म्हणून ओळख असलेले अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडलेला असाच एक किस्सा नितीन गडकरींनी शनिवारी नागपुरात बोलताना सांगितला. अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेला संवाद त्यांनी सांगताच उपस्थितांसोबतच व्यासपीठावरील मान्यवरांमध्ये देखील एकच हशा पिकला.
“आता एक खड्डा दिसला की लोक विचारतात…”
नागपूरमध्ये जीवन छाया लेआऊट ग्राऊंडचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्याहस्ते झालं. यावेळी आपल्या भाषणात नितीन गडकरींनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी लोकांच्या एका सवयीबद्दल देखील मिश्किल टिप्पणी केली. “आता सगळे सिमेंटचे रस्ते आहेत. मी एक पाहिलं, की तुम्ही जेवढं चांगलं काम कराल, त्याची आठवण लोक लवकर विसरतात. पण एखादा खड्डा दिसला, की लगेच कुठे आहे गडकरी? कुठे आहेत फडणवीस? खड्डा का नाही बुजवला? म्हणजे चांगल्या गोष्टी कितीही केल्या, तरी एखादी गोष्ट जरी राहिली, तरी लोक बोलतात”, असं गडकरी यावेळी म्हणाले.
नितीन गडकरी आणि त्यांचं वजन!
दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी उत्तम आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि चांगल्या दर्जाचा आहार असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. “मैदानावर खेळणं, शुद्ध हवा मिळणं, रसायनमुक्त भाजीपाला-धान्य वापरणं याविषयी जागृती वाढतीये. याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे”, असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाताही व्हायला हवे!; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
“मी आमच्या घरी गेल्या वर्षभरापासून रोज प्राणायाम करतो. माझं वजन १३५ किलो होतं. आता माझं वजन ९३ किलो आहे. मला एकदा अमिताभ बच्चन मला हसत हसत म्हणाले, नितीनजी क्या बात है, मेरे कुछ समझ में नहीं आर रहा है. आप १० साल यंग लग रहे हो. मी हसून म्हटलं मै रोज एक घंटा प्राणायाम करता हूँ”, असं गडकरींनी यावेळी बोलताना सांगितलं.