शिवसेना उबाठा गटाचे तरूण नेते, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तर विरोधकांनी याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा मागितला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक आरोप केला. घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिसला ठाकरे गटानेच मोठे केले होते, तसेच पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्यात बैठक ठरली होती, अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.
“गाडीखाली एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर…”, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे विधान
काय म्हणाले उदय सामंत?
पत्रकार परिषदेत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, मॉरिसचा वर्षा बंगल्यावरील फोटो दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाहक बदनामी केली जात आहे. मात्र यापूर्वी मॉरिसला मोठं करण्याचं काम सामना दैनिकाने केले असल्याचा आरोप सामंत यांनी केला. तसेच मॉरिसच्या सामाजिक कार्याला सामनातून पाठिंबा होता, तर घोसाळकर यांच्या कार्याला मातोश्रीवरून पाठिंबा होता, असे सामंत यांनी म्हटले. तसेच मॉरिसने मागच्या काही काळात केलेल्या सोशल मीडिया पोस्टचाही दाखला दिला.
“…आणि मॉरिसने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या”, प्रत्यक्षदर्शी लालचंद पाल यांनी सांगितला थरार
मॉरिस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटला, यापेक्षा निधन पावलेले माजी नगरसेवक गोळीबारापूर्वी कुणाला भेटले? हादेखील मोठा प्रश्न आहे. याचा तपास झाला पाहीजे. फेसबुक लाईव्हमध्ये मतभेद सोडविण्यासंबंधी त्या दोघांनी चर्चा केली. हे मतभेद सोडविण्यासाठी बैठक कुणी घ्यायला सांगितली? तसेच ते दोघेही आता हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्या पश्चात आरोप करणे आम्हाला पटत नाही. पण उबाठा गटामुळे ही वेळ आली आहे. त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये ते यापुढे एकत्र काम करायचे आहे, असे का बोलत आहेत? हेदेखील जनतेसमोर आले पाहीजे, अशी मागणी उदय सामंत यांनी केली.
उदय सामंत पुढे म्हणाले की, घोसाळकर कुटुंबाच्या घरात जी घटना घडली, ती चुकीचीच आहे. त्याचे कुणीही समर्थन करत नाही. मात्र घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना त्यात ओढण्याचा प्रयत्न होत आहे. ही दुर्दैवी बाब आहे.
पालघर, वाझे प्रकरणात गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला का?
उबाठा नेते संजय राऊत यांनी गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे. यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ठाकरे सरकार असताना पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाले, तेव्हा का नाही राष्ट्रपती राजवट लावली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवली, तेव्हा का नाही गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला? तेव्हा कोणतीही कारवाई न करणाऱ्या लोकांना आज राजीनामा मागण्याचा अधिकार नाही.