जवळपास तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र, हे सगळं घडत असताना आणि त्यानंतरही गेल्या तीन महिन्यांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना सुरू असताना दुसरीकडे शिवसेना विरुद्ध भाजपा असाही सामना सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेकदा खालच्या पातळीवर टीका होत असल्याचं दिसून आलं आहे. यासंदर्भात काही राजकीय नेतेमंडळींनी याआधीही मत व्यक्त केलं असताना आता शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्वीट करून भूमिका मांडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातच शिंदे गटाचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या उदय सामंत यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केल्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाच्या दिशेने आहे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर बुधवारी सकाळी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्य ‘महाराष्ट्रातील काही नेत्यांना’ उद्देशून त्यांनी विनंती केली आहे. पण हे ‘काही नेते’ नेमके कोण? यावर मात्र त्यांनी या ट्वीटमध्ये उल्लेख केलेला नाही.

‘भावी पिढीला तिरस्कार वाटेल अशी..’

‘महाराष्ट्रातील काही नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो. राजकारणामध्ये टीका-टिप्पणी होत असते. पण टीका करताना आपण जी पातळी गाठतोय, ती योग्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत जनतेचा आहे. भावी पिढीला राजकारण्यांबद्दल तिरस्कार वाटेल, अशी वक्तव्य होऊ नयेत अशी माधी नम्र विनंती’, असं उदय सामंत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, उदय सामंत यांच्या या ट्वीटमुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या खालच्या पातळीच्या टीका-टिप्पणीवरून उदय सामंत यांनी हे ट्वीट केल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet minister uday samant tweet appeals some leaders to speak properly pmw