Subhash Dandekar Camlin Founder Death Raj Thackeray Paid Tribute : कॅम्लिन उद्योगसमूहाचे प्रमुख व हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचं आज (१५ जुलै) सकाळी सातच्या सुमारास मुंबईत निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जगभर डंका वाजवणाऱ्या या मराठी उद्योजकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी सुभाष दांडेकरांबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून कॅम्लिन आणि सुभाष दांडेकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “कॅम्लिने सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचं आज निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिन या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा ‘कॅम्लिन’शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पेटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा असलेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून दुसऱ्या कंपास पेटीचा विचारच करता येत नव्हता. फुटपट्टी, खोडरबर ते पेन्सिलपर्यंत प्रत्येक गोष्ट कॅम्लिनचीच असायची. पुढे कॅम्लिनचा ब्रश, रंग हातात आले. खरतर लहानपानापासूनच कॅम्लिनच्या रंगात मी रंगून गेलो होतो. पण ‘कॅम्लिन’ हा ब्रँड किती मोठा आहे हे मात्र त्या वयात जाणवलं नव्हतं.”
राज ठाकरेंनी सांगितली ‘उंटा’च्या लोगोची गोष्ट
“१९३१ ला वेधशाळेत काम करणाऱ्या आणि महापालिकेत काम करणाऱ्या उच्चशिक्षित बंधूनी नोकरी सोडून सुखासीन सरकारी नोकरीचा ध्यास सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा आणि तो देखील शाई बनवण्याचा. वेधशाळेत ढग कसे जमा होतात हे बघण्याच्या ऐवजी लोकांनी तेच ढग आपल्या रंगाने रंगवावेत असं का वाटलं असावं हे त्यांनाच माहीत. शाईपासून सुरू झालेला प्रवासाने, ‘कॅम्लिन’च्या ब्रॅण्डची ठळक मुद्रा जगभर उमटवली. ‘उंट’ ही कॅम्लिनची नाममुद्रा, महाराष्ट्रात न दिसणारा प्राणी नाममुद्रा म्हणून का घेतला याची कथा मला एकदा दांडेकरांनी सांगितली होती.”
![camlin subhash dandekar marathi news](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/cats_4adcb5.jpg?w=830)
शाई ते फाउंटन पेन्स, पेन्सिली, रंगवण्याचे ब्रश, क्रेयॉन्स पासून अनेक प्रकारचे रंग, खोडरबर ते ऑफिसेसला लागणाऱ्या स्टेशनरीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी कॅम्लिनने बनवल्या. इंग्रजीत एक म्हण आहे जिचा भावार्थ आहे, ‘उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला’. पण दांडेकरांच्या उंटाला कलात्मक उत्पादनाचं कधीच ओझं झालं नाही. मराठी उद्योजकाने घेतलेली ही लक्षणीय उडी. पुढे काळाच्या ओघात इतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या, पण ‘कॅम्लिन’च्या उत्पादनांमध्ये जी एक सौंदर्यदृष्टी आहे, ती मात्र कुठल्याच उत्पादनांमध्ये दिसत नाही.
हे ही वाचा >> “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य
मराठी मनांनी प्रेरणा सुभाष दांडेकरांकडून प्रेरणा घ्यावी : राज ठाकरे
जागतिकरणाच्या ओघात कॅम्लिनचा मोठा हिस्सा ‘कोकुयो’ नावाच्या जॅपनीज कंपनीने घेतला. पण जे मोजके मराठी ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले, त्याची दखल जगाने घेतली त्यात ‘कॅम्लिन’ हा एक महत्वाचा ब्रँड. आज सुभाष दांडेकरांच्या निधनानंतर हा सगळा पट डोळ्यासमोर आला. ‘कॅम्लिन’ या ब्रँडच्या प्रवासाने किंवा एका उंटाच्या नाममुद्रेच्या प्रवासातून मराठी मनांनी प्रेरणा घेऊन, मोठी स्वप्नं पहायला हवी आणि अर्थात ती प्रत्यक्षात पण उतरवायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुभाषजी दांडेकरांना विनम्र श्रद्धांजली…