राहाता : शिर्डीतील घडलेल्या दुहेरी हत्याकांड नंतर पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शिर्डीतील गुन्हेगारी तसेच अवैद्य व्यवसायाच्या कारवाईनंतर आज गुरुवारी सकाळीच पोलीस, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकर धरपकड मोहीम शिर्डीत दिवसभर राबविण्यात आली या मोहिमेत ६० पुरुष तसेच १२ महिला असे एकूण ७२ भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आज गुरुवारी भल्या सकाळपासून अचानक शिर्डी पोलिस, साईबाबा संस्थान व नगरपंचायत यांच्या संयुक्त पथकाने चावडी परिसर,द्वारकामाई,सोळा गुंठे,साई कॉम्प्लॅक्स,दोनशे रूम,बसस्थानक परिसर तसेच इतर भागातून चित्रविचित्र कपडे घालून भाविकांना मागे लागत पैसे आणि खाण्याच्या वस्तूंची मागणी करणाऱ्या तब्बल ७२ भिक्षेकरी महिला व पुरुषांना ताब्यात घेत विविध रिक्षांमधून गोळा करत बसद्वारे शिर्डी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या सर्वांना जेवण देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.अशी माहिती शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.
या भिक्षेकरी लोकांमध्ये शिर्डीतील लोकांनी त्यांच्या वागणुकी नुसार मिश्किल ठेवलेले नावे – अवलिया, दारू पिऊन गाणे गात फिरणारी राणू मंडल..तर कर्णकर्कश शिट्ट्या वाजवत अचानक जमिनीवर लोटांगण घेत कोलांटी उडी मारणारा गुल्ल्या, दिवसा दारू पिऊन भाईगिरी करत कुठेही झोपून जाणारी चोपडी यांसह बिगारी काम करणारे सुद्धा काहींना आपली व्यथा मांडताना दिसून आले तर त्यात काही भल्या सकाळी फुल्ल झिंगून आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते अचानक झालेल्या कारवाईने अनेकजण मानसिक धक्क्यात असताना चेहरे उतरून बसलेले असताना मात्र एक तज्ञ भिक्षेकरी इतक्या टेन्शनच्या प्रसंगी निवांत पेपर वाचत बसल्याचे दिसूनआले. तर काहींचे नातेवाईक पोलिस ठाण्याच्या जवळ आपल्या नातेवाईकांना पकडल्याचे कळताच सोडविण्यासाठी कागदपत्रे घेऊन हजर होते.
पुरुष भिकारी- शिर्डी (७), अहिल्यानगर (७), मुंबई (४), संभाजीनगर (९). नाशिक (८ ),पुणे (३), वाशिम (२) जळगाव (३) अकोला (२) बुलढाणा, नांदेड, जालना, बीड, सांगली, सोलापूर, येथील प्रत्येकी एक तर कर्नाटक (३) मध्यप्रदेश (२) बिहार व पश्चिम बंगाल येथील प्रत्येक एक, महिलां- (८) अहिल्यानगर, एक भंडारा, दोन नाशिक, कर्नाटक एक या ठिकाणचे भिक्षेकरी ताब्यात घेण्यात आले.
शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना मोठ्या प्रमाणात भिक्षेकर्यांच्या त्रास होत असल्याने भक्तांकडून त्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने या पार्श्वभूमीवर आज शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भिक्षेकरी मोहीम राबविण्यात आली या भिक्षेकरांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुरुष भक्षेकर्यांना विसापूर (तालुका श्रीगोंदा) तर महिला भिक्षेकर्यांना चेंबूर (मुंबई) येथील भिक्षेकरी भिक्षेकरी गृहात रवानगी करण्यात येणार आहे. – रणजीत गलांडे, पोलिस निरीक्षक, शिर्डी