नक्षलवादी चळवळीतील अनेक जहाल सदस्य शहरी भागात वेगाने विस्ताराच्या मागे लागलेले असताना राज्य शासनाचे नक्षलवाद विरोधी अभियान मात्र कर्मचाऱ्यांच्या तुटवडय़ामुळे आकुंचन पावत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. आतापर्यंत सुमारे ७०० पोलीस व नागरिकांचे बळी घेणाऱ्या या चळवळीच्या निर्मूलनासाठी शासन गंभीर नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली आहे.
गेल्या ३३ वर्षांपासून पूर्व विदर्भात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी राज्य शासनाने नागपुरात नक्षलवादविरोधी अभियानाची स्थापना केली आहे. या अभियानाचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. गडचिरोली वगळता राज्याच्या इतर तसेच शहरी भागात वाढणाऱ्या या चळवळीला आळा घालण्याची जबाबदारी या अभियानावर आहे. सध्या या अभियानाचे प्रमुख अनुपकुमार सिंग आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अभियान अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुकाच शासनाने केलेल्या नाहीत. या अभियानाच्या कार्यालयात पोलीस उपअधीक्षक दर्जाचे एक पद मंजूर असून ते अनेक वर्षांपासून रिक्त आहे. पोलीस निरीक्षकांची ५ पैकी ४ पदे रिक्त आहेत, तर सहायक पोलीस निरीक्षकांची ४ पैकी ३ पदे रिक्त आहेत. शिपायांची १६ पैकी ८ पदे रिक्त आहेत.
याच अभियानाच्या अंतर्गत आंध्र प्रदेशमधील ग्रे हाउंडच्या धर्तीवर स्थापण्यात आलेल्या विशेष कृती दलाची तुकडी काम करते. २५० प्रशिक्षित जवानांच्या या तुकडीचे नेतृत्व पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आहे. सध्या या पदावर श्रीकांत धिवरे कार्यरत आहेत. या तुकडीसाठी आवश्यक असलेली उपअधीक्षक दर्जाची ४ पैकी ४ ही पदे रिक्त आहेत. या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी केवळ १ पोलीस निरीक्षक आहे, तर सहायक पोलीस निरीक्षकाची १ जागा रिक्त आहे. या तुकडीच्या निर्मितीनंतर तब्बल ६ वर्षांनी या कृती दलात १८ पोलीस उपनिरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या. सुमारे ५ वर्षे ही पदे रिक्त होती. या तुकडीसाठी आवश्यक असलेली सहायक पोलीस निरीक्षकाची ४ पैकी ४, हवालदारांची ४ पैकी ४, तर नाईक शिपायांची १४ पदे आरंभापासून रिक्त आहेत. २५० प्रशिक्षित जवानांची क्षमता असलेल्या या दलात १७ जवानांची पदे रिक्त आहेत. अधिकारी व कर्मचारीच नसल्याने या अभियानाचा कारभार विस्तारण्याऐवजी आकुंचन पावत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
या पाश्र्वभूमीवर आतापर्यंत जंगलात सक्रिय असलेले नक्षलवादी शहरात जम बसवण्यासाठी जोरात कामाला लागले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार जामिनावर सुटलेला अरुण परेरा, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून शिक्षा पूर्ण झाल्यामुळे नुकताच बाहेर आलेला वर्णन गोन्सालवीस, नक्षलवादाचा आरोप असलेले व जामिनावर सुटलेले पुण्याच्या कबीर कला मंचचे कार्यकर्ते या चळवळीची शहरी भागात पुनस्र्थापना करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला जहाल नक्षलवादी श्रीनिवासन ऊर्फ विष्णूसुद्धा पुढील महिन्यात बाहेर पडणार आहे. या सर्वाच्या सक्रियतेमुळे भविष्यात मोठा धोका संभवतो, असा अहवाल या यंत्रणांनी दिला असला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियानाकडे मनुष्यबळच नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

घातपाताची शक्यता
१९८० पासून आतापर्यंत नक्षलवाद्यांनी २०१ पोलिसांना, तर ४८९ नागरिकांना ठार केले आहे. तर पोलिसांच्या कारवाईत १४८ नक्षलवादी ठार झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत गडचिरोली पोलिसांनी २३ नक्षलवाद्यांना ठार केल्याच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह आजपासून सुरू झाला असून, तो येत्या ३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात नक्षलवादी घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे.

Story img Loader