सोलापूर : शेवटपर्यंत कमालीची चुरस असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रविवारी सायंकाळी सांगता झाली. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी दुपारच्या तळपत्या उन्हात भाजपचा मजबूत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसांघातून पदयात्रा काढून मोठे शक्तिप्रदर्शन घडविले. या माध्यमातून अखेरच्या क्षणी जातीच्या समीकरणे जुळविण्याच्या हेतूने विणकर पद्मशाली आणि लिंगायत समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला. तर भाजपचे राम सातपुते यांनी पदयात्रांऐवजी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी आदी ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभांच्या माध्यमतून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
सोलापुरात गेल्या १५-२० दिवसांपासून निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. एकीकडे कडक उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४१ ते तब्बल ४४.४ अंशांवर जात असताना त्याचा प्रचंड त्रास सहन करीत राजकीय पक्षांच्या तुल्यबळ उमेदवारांच्या प्रचारयुद्ध सुरू होते. भाजपचे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेवटी नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. या माध्यमातून मतदारांना मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपले मत स्थानिक उमेदवारांपेक्षा मोदींनाच देण्याचा मुद्दा मतदारांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय धार्मिक ध्रुवीकरणावरही शेवटच्या टप्प्यात जोर देण्यात आला.
काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा झाल्या. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तसेच सतेज पाटील व विश्वजित कदम यांच्यासारख्या तरुण नेत्यांच्या सभा झाल्या. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कन्या प्रणिती यांच्या प्रचाराची कमान सांभाळली.
रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुपारच्या रणरणत्या असह्य उन्हात प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेतून मोठे शक्तिप्रदर्शन घडविण्यात आले. यात सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माकपचे नेते नरसय्या आडम आदींनी पायपीट केली. त्यानंतर सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात कारखान्याच्या सभासदांसह धर्मराज काडादी यांच्या समर्थकांचा मेळावा झाला.
हेही वाचा – सांगली : फेक न्यूज समाजमाध्यमात प्रसारित केल्याबद्दल अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची अक्कलकोट शहरात जंगी सभा झाली. मोदी सरकारकडून राज्यघटना बदलली जाईल, लोकशाही संपून हुकूमशाही येईल, असे भीतीवजा इशारे काँग्रेससह विरोधक देत असल्याच्या संदर्भावर भाष्य करताना गडकरी यांनी, गेल्या ७० वर्षांत काँग्रेसची सत्ता असताना ८० वेळा घटनेत बदल झाले. तेच पुन्हा घटना बदलाची भीती व्यक्त करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. देशातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली देशातील गरिबी खऱ्या अर्थाने दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रचारासाठी शहरातील इंदिरा गांधी विडी घरकुलात तेलगणातील वादग्रस्त आमदार राजासिंह ठाकूर यांचीही सभा झाली. त्यांनी आपल्या भाषणातून धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न केला.