Sanjay Shirsat on Sharad Pawar: “विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोण कोणाबरोबर असेल, हे आताच सांगता येत नाही”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक काही दिवसांपूर्वी बोलले होते. आता मतदान पार पडल्यानंतर पुन्हा एकदा निकालानंतर काय चित्र असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. यानिमित्ताने हाच प्रश्न शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनाही विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना संजय शिरसाट यांनी ही शक्यता थेट फेटाळून लावली नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि त्यांना दुय्यम भूमिका निभावावी लागली तर काय करणार? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना टिव्ही ९ या वृत्तवाहिनीने विचारला. यावर ते म्हणाले, यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील. निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्याबरोबर गेले तर? असा प्रश्न विचारला असताना संजय शिरसाट म्हणाले की, शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी उटी जाणार की गुवाहाटी?

२०२२ रोजी सत्तातंर होत असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार सूरत, गुवाहाटी आणि गोव्याला गेले होते. त्यामुळे यावेळी निवडणुकीनंतर उटी जाणार की गुवाहाटी? असा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आम्हाला उटी किंवा गुवाहाटी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आम्ही सगळे मुंबईतच जाऊन जीवाची मुंबई करू. आमदारांचा गटनेता निवडण्यासाठी सर्व आमदारांना एकत्र ठेवावे लागते. त्यासाठी एकदाच हॉटेलवारी करावी लागेल.

अपक्ष आमदारांसाठी हेलिकॉप्टर, विमाने आधीच बुक

यंदाच्या निवडणुकीत अपक्षांचा आकडा मोठा असू शकतो, अशी एक शक्यता आहे. निकालानंतर त्यांना लवकर मुंबई आणावे लागेल. यासाठी हेलिकॉप्टर आणि विमाने बुक केल्याची चर्चा आहे यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार आहेच. पण शेवटच्या क्षणी जोखीम नको म्हणून काही खबरदारीचे उपाय राबवते. अपक्षांना संपर्क साधणे, हा नियमित राजकारणाचा भाग आहे. अपक्षांनादेखील याची जाणीव असते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can eknath shinde join hands with sharad pawar after maharashtra assembly elections 2024 shinde faction leader sanjay shirsat reaction kvg