Raj Thackeray on Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांना घेऊन शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने एकत्र यावं, अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. मात्र, एकत्र येण्याच्या या चर्चेवर भाष्य करण्यास दोन्ही ठाकरेंनीही कायम टाळाटाळ केली. मात्र, यावर आज राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.”

महाराष्ट्राची इच्छा असेल तर…

“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही (एकनाथ शिंदेंच्या बंडासारखं) तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी दिली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येणं गरजेचं आहे का?

महाराष्ट्रासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येणं गरजेचं आहे का? असाही प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “मी महाराष्ट्रासाठी जे करू शकतो, त्याकरता भाजपाबरोबर एकत्र येणं हे राजकीय होईल. पण आमच्या सर्वच बाबतीत एकमत होईलच, असं नाही. आम्ही एकमेकांना हस्तांदोलनही करू शकतो किंवा एकमेकांना पाहून हातही जोडू शकतो. महाराष्ट्र हडपण्याचा जो प्रयत्न दिसतो, त्याविरोधात मी जेव्हा बोलेन तेव्हा हे पक्ष मला किती साथ देतील हे मला माहीत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंचीही साद

एकत्र येण्याकरता राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. “आमच्यात भांडण नव्हतंच, पण तरीही आमच्यातील भांडणं मिटवून टाकल्याचं मी जाहीर करतो. त्यावेळेला सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर यायचं. मग काय द्यायचाय त्या तो पाठिंबा बिनशर्त द्या. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्थ माझी आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can raj and uddhav thackeray come together what raj thackeray said first time sgk