गोदावरी उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रातील वाकडी परिसरात पाणीप्रश्न गंभीर झाल्याने या परिसरातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत होते. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाकडी, चितळी, जळगाव या भागातील चाऱ्यांना दि. १८ व १९ ला या दोन दिवशी शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय मागे घेतला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, नितीन कापसे, नंदू जेजुरकर आदी उपस्थित होते.
पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वाकडी, चितळी व जळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याच्या बाबतीत अन्याय केला. हक्कासाठी शेतकरी लढा देत असताना त्यांच्यावर गुन्हे केले. या विषयांवर विखे व  कोल्हे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यातून वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.
राहाता उपविभागाचे शाखा अभियंता दिलीप शिरसाठ यांनी शेतकऱ्यांना पाणीप्रश्नाबाबत उर्मट भाषेत उत्तर दिले. तर उपअभियंता बाफना यांनी जमले तर अजून दोन दिवस पाणी सोडू. आमच्या नियोजनात कुठलीही चूक होत नसल्याचे सांगितले. या परिसरात डाळिंब, ऊस, द्राक्षे, जनावरांचा चारा ही पिके सध्या उभी आहेत. सात नंबर फार्म भरूनही शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागतात.

Story img Loader