खंडाळा येथील महामार्गावर कंटेनर उलटून झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावरील सर्व अनधिकृत बसथांबे रद्द करण्याचे आदेश दिले. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आदेश दिले.
पुणे-कोल्हापूर महामार्गावर अनेक ठिकाणी एसटी प्रवाशांचे अनधिकृत थांबे तयार झाले आहेत. वाहत्या महामार्गावरील या थांब्यावर प्रवासी गटागटाने उभे असतात. त्यांचे हे थांबणे अनेकदा अपघाताला निमंत्रण ठरणारे ठरले आहे. यापूर्वी अनेक किरकोळ अपघात यातून घडलेले आहेत. अनेक एसटी बसस्थानकात न जाता या प्रवाशांना रस्त्यावरच बसमध्ये घेतात. याशिवाय हे प्रवासी अनेक खासगी गाडय़ांनाही हात दाखवून थांबवत असतात. यामुळे अनेकदा या अशा अनधिकृत थांब्यावर वाहने अचानक थांबल्याने अपघात घडतात. रविवारी घडलेल्या अपघातातील कंटेनरही कलंडल्यावर रस्त्याच्या कडेस उभ्या असलेल्या या प्रवाशांच्या अंगावर पडल्याने मोठी जीवितहानी झाली. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावरील सर्व अनधिकृत बसथांबे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
 

Story img Loader