महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे राज्य सरकारकडून अलिबागजवळ बांधले जाणारे स्मारक कायमस्वरूपी रद्द करा, अशी मागणी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन स्मारक रद्द करावे आणि स्मारकाचा निधी विकास कामांसाठी वापरावा, अशी विनंती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मारकासंदर्भात घडलेल्या घटनांमुळे आपण व्यथित झालो असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
माझे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अत्यंत निष्कामपणे प्रबोधनाच्या माध्यमातून समाजकार्य केले. अपार कष्ट करून त्यांनी समाजात इष्ट परिवर्तन घडवून आणले. कल्याणकारी आणि हितकारी समाजसेवेचे कार्य त्यांनी स्वबळावर उभे केले. प्रसिद्धीच्या विन्मुख राहून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आणि महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांना गौरविले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी स्मारकाची घोषणा केली. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून या स्मारकाच्या बाबतीत सुरू असलेल्या घटनांनी माझे मन व्यथित झाले असल्याचे अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.
नानासाहेबांनी कोणालाही न दुखावता कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चात स्मारकावरून वाद निर्माण होणे त्यांच्याच विचारांशी सुसंगत नाही. म्हणून राज्य सरकारने नानासाहेबांचे स्मारक कायमस्वरूपी रद्द करावे, व तो निधी विधायक कामांसाठी वापरावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Story img Loader