सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ३२९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७१७८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षांत काही ठिकाणी गाव पॅनेल उभी करण्यात आली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात लोकसभा निवडणूक पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाने गावागावात पक्षाची ताकद निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवाय राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, भाजप, जनता दल या पक्षांनीदेखील ग्रामपंचायतींवर उमेदवारांच्या विजयासाठी सत्तासंघर्ष सुरू केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करण्यासाठी राजकीय पक्षांचा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. त्यातच मतांचा बाजार रोखण्यासाठी विरोधकही प्रयत्नशील आहेत.
जिल्ह्य़ातील ३२९ ग्रामपंचायतींत तालुकानिहाय उमेदवारी अर्ज भरले गेले ते कणकवली १२९४, मालवण १०८५, सावंतवाडी ११९३, कुडाळ १३८१, वेंगुर्ले ६७२, दोडामार्ग ५२५, देवगड ७८२ व वैभववाडी २४६ नामनिर्देशन फॉर्म भरले आहेत.
या निवडणुकीत नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या १० नोव्हेंबर या तारखेदिवशी बिनविरोध ठरलेल्या ग्रामपंचायतींत कणकवली ३, वैभववाडी ६, वेंगुर्ले १, मालवण ७, सावंतवाडी ३, कुडाळ २ असा समावेश आहे. तसेच काही प्रभाग बिनविरोध ठरले आहेत. येत्या १६ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.
येत्या २६ नोव्हेंबर रोजी मतदान तर २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ग्रामपंचायतींत बिनविरोध निवडणुका व्हाव्यात म्हणून नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राजकीय आर्थिक दबाव टाकला जात आहे, असे सांगण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी भरली नामनिर्देशनपत्रे
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ३२९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७१७८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राजकीय पक्षांच्या सत्तासंघर्षांत काही ठिकाणी गाव पॅनेल उभी करण्यात आली आहेत.
First published on: 17-11-2012 at 04:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate filing the form for garm panchayat at sindhudurg