सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असलेल्या व्यक्तीला निवडणुकीत उमेदवारी करता येत नाही. खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीविरोधात आपण उच्च न्यायालयात आक्षेप नोंदविणार आहोत, असे महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी म्हटले आहे.
महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. आमदार ओम राजेिनबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, जि. प. बांधकाम सभापती धनंजय सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, रवींद्र इंगळे, अश्रुबा कोळेकर, मराठा महासंघाचे जगताप आदी उपस्थित होते. उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आपण आक्षेप नोंदविला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार अशा पद्धतीचे आक्षेप स्वीकारण्याबाबत सूचना नसल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकाऱ्यांनी आपले आक्षेप फेटाळून लावले. आपण सादर केलेले आक्षेप व त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या नकला मिळाव्यात, अशी विनंती केली आहे. त्या मिळाल्यानंतर पाटील यांच्या उमेदवारीविरोधात उच्च न्यायालयात आक्षेप नोंदविणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. पाटील यांनी सादर केलेल्या शपथपत्रात एका गुन्ह्याची नोंद केली नाही. ती माहितीही गुन्हा रजिस्टर क्रमांकासह आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे ते म्हणाले.
रोहन देशमुखांची बंडखोरी कायम
दरम्यान, पक्षहित समोर ठेवून बंडखोरीचा निर्णय मागे घेतला असल्याचे धनंजय सावंत यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अपक्ष रोहन देशमुख यांनी भाजपचा झेंडा अथवा नरेंद्र मोदी यांचे नाव रोहन देशमुख यांनी वापरल्यास त्यांच्या विरोधात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करू. पक्षाच्या वरिष्ठांना देशमुख यांच्या बंडखोरीचा अहवाल सादर केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष सुभाष देशमुख यांची पक्षातून लवकरच हकालपट्टी होईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा