महापालिका निवडणुकीसाठी भाजप, ताराराणी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (आठवले गट) या महायुतीने ४१ जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर करताना बेरजेच्या राजकारणावर भर दिल्याचे दिसून आले. शिवसेनेचे महापालिका गटनेते संभाजी जाधव यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत ‘कमळ’ हाती घेतल्याने तो सेनेला धक्का ठरला. काँग्रेसचे नगरसेवक सत्यजित कदम यांच्या वहिनी सीमा शशिकांत कदम या महाडिक वसाहतमधून लढणार असल्याचे स्पष्ट झाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील हे शिवाजी उद्यमनगर येथून िरगणात उतरले आहेत, तर त्यांची कन्या श्रुती पाटील या महालक्ष्मी प्रभागातून नशीब अजमावीत आहेत. कनान नगरमधून पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे सुनील मोदी िरगणात उतरणार आहेत. माजी महापौर नंदकुमार वळंजू यांना ताराराणी आघाडीकडून शास्त्रीनगर-जवाहरनगरातून उमेदवारी मिळाली. उद्योगपती जाधव यांच्या घरात दोघांना उमेदवारी दिली आहे. संभाजी जाधव हे कैलासगडची स्वारी प्रभागातून भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या भावजय जयश्री चंद्रकांत जाधव या सम्राटनगरमधून िरगणात उतरल्या आहेत.
एका जागेवर बोळवण केल्याने आर.पी.आय.चा तिळपापड झाला असून वेगळा विचार करण्याचा इशारा प्रा.शहाजी कांबळे यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही रुपेश पाटील यांच्या रुपाने एक जागा देण्यात आली आहे.
भाजप-ताराराणी आघाडीने २१ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये भाजप व ताराराणी प्रत्येकी दहा, तर स्वाभिमानी पक्षाला एक जागा दिली होती. दुसऱ्या यादीत सुनील मोदी, आशीष ढवळे, विजय सूर्यवंशी, संगीता सावंत, नंदकुमार वळंजू, उषा जाधव, नंदकुमार गुर्जर या सात माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांची कन्या सुमय्या मुल्ला यादवनगरातून, विद्यमान नगरसेवक सतीश घोरपडे यांच्या पत्नी सविता घोरपडे या सुभाषनगर प्रभागातून ताराराणी आघाडीकडून लढणार आहेत. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून संभाजी जाधव यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवली.
उर्वरित यादी दोन दिवसांत
भाजप-ताराराणी आघाडीने दोन टप्प्यांत ६२ उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. उर्वरित १९ जणांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती भाजप महानगराध्यक्ष महेश जाधव व ताराराणी पक्षाचे अध्यक्ष स्वरूप महाडिक यांनी दिली.
महायुतीची ४१ जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
संभाजी जाधव यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत ‘कमळ’ हाती घेतल्याने सेनेला धक्का
Written by अपर्णा देगावकर

First published on: 01-10-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Candidate second list announced of 41 members of the alliance