राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरतीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. एकदा ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यानं राज्यातील हजारो परीक्षार्थींनी आक्रोश केला. मात्र, आता दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे. अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. उलट एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र दिल्याचं समोर येतंय. यामुळे या परीक्षार्थींनी ही परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित राहिलाय.

चंद्रपूरमधील परीक्षार्थी नितेश दडमल लोकसत्ताशी बोलताना म्हणाला, “मी चंद्रपुर जिल्हातील रहिवासी आहे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे मी ठाण्याला एवढ्या लांब जाऊन परीक्षा देऊ शकत नाही. २५ सप्टेंबर २०२१ रोजीची पुढे गेलेल्या परीक्षेला मला दोन्ही पदांकरीता नागपूर केंद्रच मिळाले होते. शासनास माझी हीच नम्र विनंती आहे की यावेळी सुद्धा परीक्षा फार्म भरताना मी जे नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं, तिथेच परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावं.” तसेच मी परीक्षेपासून वंचित राहिल्यास याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशाराही त्याने दिलाय.

आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव?

नितेश दडमल याने ट्विटरवर आपला प्रश्न मांडत थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सवाल केलाय. त्याचं हे ट्वीट मोठ्या प्रमाणात शेअर होतंय. तसेच अनेक इतर परीक्षार्थी या ट्वीटवर आपली मतं मांडत आहेत. तो म्हणाला, “आरोग्य विभागाच्या भरतीत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव जाणवल्याबद्दल टोपे साहेब अभिनंदन. अर्ज भरताना तर मी नागपूर परीक्षा केंद्र निवडलं होतं. असं असतांना आता परीक्षेला सकाळच्या सत्रात ठाणे आणि दुपारच्या सत्रात वाशिम परीक्षा केंद्र दिलंय. आरोग्य भरती करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो.”

“आधी आरोग्य विभागाकडून २ सत्रात परीक्षा देण्याची मुभा, आता केंद्र वाटपात गोंधळ”

विशेष म्हणजे आरोग्य विभागातील विविध जागांसाठी अर्ज मागवताना उमेदवार २ वेगळ्या सत्रातील परीक्षेला बसू शकतात अशी मुभा देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केंद्र वाटप करताना परीक्षार्थींना या परीक्षेला उपस्थितच राहता येणार नाही अशा प्रकारे केंद्र वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. काही उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वेळी रद्द झालेल्या परीक्षेवेळी केंद्र एकाच जिल्ह्यात मिळालं होतं.

राज्यात अनेक विद्यार्थ्यांना केंद्र वाटपात गोंधळ, परीक्षार्थींकडून संतप्त प्रतिक्रिया

भाऊसाहेब कोकरे हा परीक्षार्थी म्हणाला, “मी २०२१ च्या आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज भरला होता, पण मला एकाच दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर २०२१ रोजी/सकाळी १० ते १२ या वेळेत ३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणे कसे शक्य होईल?” संतोष धस या परीक्षार्थीने म्हटलं, “अभिनंदन साहेब आम्हाला तुम्ही परीक्षेला बसून देऊच नका. मी गट ‘क’साठी २ अर्ज भरले आहेत. मी परीक्षा सेंटर नाशिक, अहमदनगर, ठाणे टाकले होते. प्रत्यक्षात मला पहिला पेपर नाशिकला आला आहे आणि दुसरा पेपर सोलापूर येथे आहे. आता तुम्ही सांगा कसा पेपर द्यायचा? सरकारने केवळ फी गोळा करायची का?”

“टोपे साहेब मुलांच्या आयुष्याचा खेळ करू नका”

“मी अर्ज करताना केंद्र नागपूर निवडले होते. असं असताना माझा पहिला पेपर लातूर आणि दुसरा पेपर अकोला येथे देण्यात आला. टोपे साहेब इतकेही मुलांच्या आयुष्याचा खेळ करू नका. कणखर महाराष्ट्राचं नाव घालवू नका,” अशी संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्धी अभिजीत कोर्डे याने व्यक्त केलीय. “परीक्षा अर्ज करताना जे परीक्षा केंद्र निवडले त्याच ठिकाणी परीक्षा घ्यावी. टोपे साहेब आतातरी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जिल्ह्यात केंद्र द्या! वितरीत केलेले हॉलतिकिट परत घ्या आणि नव्यानं प्रवेशपत्र द्या,” अशी मागणी सुमेध पाटील याने केलीय.

हेही वाचा : आरोग्य विभागाच्या ९,५०० हून अधिक पदांसाठी परीक्षा, वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र वितरणासही सुरुवात

“साहेब हेलिकॉप्टरची सुविधा करतील हीच अपेक्षा”

सौरभ देगवेकरने म्हटलं, “सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्र आणि दुपारच्या सत्रासाठी अमरावती केंद्र देण्यात आलंय. साहेब हेलिकॉप्टरची सुविधा करतील हीच अपेक्षा.”

Story img Loader