सोलापूर : रंग मिश्रीत पाण्याने भरलेले फुगे, पिचका-या, विविध रंगांची उधळण करीत रंग पंचमी साजरी होत असताना त्यात लोकसभा निवडणुकीतील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनाही रंग खेळण्याची भुरळ पडली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट भागातील लमाण तांड्यावर रंग खेळताना बंजारा महिलांसोबत पारंपारिक नृत्यही केले. तर भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी तरूणांसोबत रंग खेळताना, विजयाचा रंग तर निकालाच्या दिवशीच खेळणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले.
हेही वाचा >>> सोलापुरात रंग पंचमीत तरूणाईचा उत्साही जल्लोष
अक्कलकोट तालुक्यातील चपळगावाजवळील लमाण तांड्यावर आमदार प्रणिती शिंदे प्रचारासाठी पोहोचल्या. तेव्हा तेथील रांग पंचमीचा उत्साह पाहून त्या स्वतः रंग खेळत बंजारा महिलांच्या आनंदात सहभागी झाल्या. हलग्यांच्या तालावर बंजारा महिला पारंपारिक पोशाखात लोकनृत्य करीत होत्या. काही महिलांनी पुढे येऊन आमदार प्रणिती शिंदे यांच्या चेह-याला मोठ्या प्रेमाने रंग लावला. त्यांच्यावर गुलाब फुलांचा वर्षावही केला. नंतर बंजारा महिलांच्या सोबत फेर धरून आमदार प्रणिती शिंदे यांनी नृत्यावर ठेका धरला होता. दुसरीकडे भाजपचे उमेदवार, आमदर राम सातपुते यांनी सोलापूर शहरात आणि मंगळवेढ्यात तरूणांसोबत उत्साहाने रंग खेळला. त्यांना रंग लावण्यासाठी तरूणांची गर्दी उसळली होती. स्वतः सातपुते हे सुध्दा समोरच्या तरूणांच्या चेह-यावर रंग लावून त्यांचा उत्साह वाढवत होते. या रंगांच्या खेळातच आमदार सातपुते यांनी, लोकसभा निवडणुकीत विजयाचा रंग आपण निकालाच्या दिवशी जरूर खेळणार असल्याचे मोठ्या आत्मविश्वासाने नमूद केले.