औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाच्यावतीने उमेदवार म्हणून सुभाष लोमटे यांच्या नावाच्या घोषणेचे वृत्त जेव्हा धडकले, त्या वेळी शहरात पक्षाच्या बैठकीत मात्र गदारोळ सुरू होता. जालना अथवा औरंगाबाद या मतदारसंघातून उमेदवारीसाठी बाळासाहेब सराटे प्रयत्न करत होते. त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांकरवी गोंधळ घडवून आणला, असा आरोप ‘आप’च्या हरमीत सिंग यांनी केला. दरम्यान, बाळासाहेब सराटे यांच्यासह तिघा जणांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे एक स्वाक्षरी नसलेले पत्रक प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आले. दरम्यान, लोमटे यांना उमेदवारी मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले. उमेदवारीनंतर आपल्या नावापाठीमागे ‘साथी’ असा उल्लेख आवर्जून करावा, असे लोमटे यांनी कळविले.
आम आदमी पक्षाच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला. पक्षाचे सचिव हरमीत सिंग यांच्या विरोधात तक्रार असल्याचे काही कार्यकर्ते सांगत होते. या वेळी पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शकील अहमद यांना काही कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरले. या घटनेपाठीमागे बाळासाहेब सराटे यांचा हात आहे. त्यांनी हा तमाशा नाहक घडवून आणला, असा आरोप हरमीत सिंग यांनी केला. दरम्यान, बाळासाहेब सराटे, उदय सोनुने, मीर एहतेशाम अली यांना पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे एक पत्रक वितरीत करण्यात आले. हे पत्रक मनीषा चौधरी यांच्या नावे आहे. मात्र, त्यांची त्यावर स्वाक्षरी नाही. या अनुषंगाने सराटे यांना विचारले असता ते म्हणाले, मी पक्षाच्या विरोधात कोणतेही काम केले नाही. उलट हरमीत सिंग यांच्यावरच आरोप आहेत. प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्याचे अधिकार या कार्यकारिणीला नाही. माझी नाहक बदनामी चालविली असल्याने मी या सदस्यांविरुद्ध फौजदारी दाखल करणार आहे. दरम्यान, सुभाष लोमटे यांना उमेदवारी मिळाल्याचे वृत्त दुपारी धडकल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.