सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सारंग पाटील यांना पक्षातर्फे विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त कराडमध्ये धडकताच समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
सारंग पाटील हे बीई मॅकेनिकल व एमबीए असून, सनबीम शैक्षणिक संस्था समूहाचे अध्यक्ष आहेत. उच्च तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना, तंत्रज्ञानाच्या अंगाने विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देत ते ग्रामीण व सर्वसामान्य तरुणांना नोकरी, उद्योग व व्यापाराची उमेद देत असतात. त्यांच्या उमेदवारीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षांकडून स्वागत होत आहे. मोदी लाटेच्या वातावरणात सारंग पाटील यांची उमेदवारी कसोटीला उतरत असून, त्यांचा सामना भाजपचे विद्यमान लोकप्रतिनिधी चंद्रकांतदादा तथा बच्चू पाटील (कोल्हापूर) यांच्याशी होत आहे. चुरशीची निवडणूक गृहीत धरून आघाडी व महायुतीने रणनीती आखल्याने विधानपरिषदेच्या सर्वच लढती लक्ष्यवेधी ठरतील असेच प्राथमिक चित्र आहे.

Story img Loader