संतोष मासोळे

मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर तालुक्याचा सर्वार्थाने विकास झाल्याचे दाखले दिले जात असताना दुसरीकडे अवैध धंद्याचे केंद्र म्हणून तो गणला जाऊ लागला आहे. या भागात नियुक्ती मिळवण्यासाठी पोलीस, महसूल, उत्पादन शुल्क विभागात प्रचंड स्पर्धा असते. राजकीय, प्रशासकीय पातळीवरून अभय मिळत असल्याने अवैध धंदे फोफावत आहेत. गांजाची मोठय़ा प्रमाणात होणारी शेती, हा त्यातील एक प्रकार आहे.

या तालुक्यात किलो, टनावारी गांजा सापडतो. एवढेच नव्हे तर, गांजाची शेती केली जाते. वनविभागाच्या जमिनींवरही अशा अमली वनस्पतीची शेती केली जाते. तरीही यंत्रणेला मागमूस लागत नाही. राज्याच्या सीमेवरील शिरपूर हा तसा सधन तालुका. जलयुक्त शिवारची प्रभावीपणे राबविलेली योजना, पिण्यासाठी शुद्ध पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांची मुबलकता यामुळे शिरपूरचा सर्वागीण विकास होण्यास हातभार लागला. पण तालुक्याची दुसरी बाजू काळवंडलेली आहे. मध्य प्रदेशलगतचे स्थान हे शिरपूरचे बलस्थान. त्यामुळे उद्योग, व्यवसायाची भरभराट होण्याबरोबर अवैध धंद्यांनी हातपाय पसरल्याचे दिसून येते. रेशनचे काळे धान्य, सट्टा-मटका, बनावट मद्य, स्पिरिट, बेकायदेशीर वाळू-मुरुमासह गौण खनिजाचे उत्खनन, गावठी कट्टय़ांची विक्री असे बेकायदेशीर धंद्याचे शिरपूर केंद्र बनल्याचे चित्र आहे.

मध्यंतरी तालुक्यात बनावट मद्याचे कारखाने आढळूनही अवैध व्यवसायाचा जोर कायम राहिला. धान्याचा काळा बाजार करणाऱ्या वाहनांची मोठी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. पण ते यंत्रणेला दृष्टीस पडत नाही. तापी नदीतून वाळूच्या होणाऱ्या अमर्याद उपशाबाबत महसूल यंत्रणा गिरवते, असा स्थानिकांचा अनुभव आहे. बहुधा यामुळेच तालुक्यात नियुक्तीसाठी स्पर्धा लागते. ज्याची नियुक्ती झाली तो अधिकारी पुढे वरिष्ठांनाही जुमानत नसल्याची काही उदाहरणे आहेत. बोभाटा झाला की, अधूनमधून कारवाई करीत यंत्रणा बेकायदेशीर धंद्यांवर नियंत्रण ठेवल्याचे चित्र तयार करते. परंतु, प्रत्यक्षात स्थानिकांचा अनुभव विपरीत आहे. अवैध व्यवसायावर कमाई करणारे पोलिसांच्या दप्तरी गुन्हेगार आहेत. त्यांचा राजकीय लाभासाठी वापर करून त्या त्या भागात राजकीय बस्तान बसविले जाते, अशी जणू अलिखित परंपरा तयार झाली आहे.

कोटय़वधींचा गांजा जप्त

लकडय़ा हनुमान गावातील मांगीलाल बारकु पावराने शेतातील कोरडय़ा चाऱ्याच्या गंजीमध्ये गांजा लपवून ठेवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याने टाकलेल्या छाप्यात ३९०४ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत गांजा, साहित्यासह तब्बल दोन कोटी ९५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader