ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये नरभक्षक बिबटय़ाचा धुमाकूळ सुरूच असून आज पहाटे वायगाव येथे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात यादव लाटेलवार (५०) हा इसम गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, नरभक्षक बिबटय़ाच्या शोधासाठी शार्प शूटरचे तीन पथक जंगल पिंजून काढत आहे, तर भाजपने २२ एप्रिलला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सोडण्यात आलेल्या सादागडच्या नरभक्षक बिबटय़ाने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. या बिबटय़ाला गोळय़ा घालून ठार करण्याचे आदेश वनखात्याने देताच शार्प शूटर तीन दिवसांपासून बिबटय़ाच्या शोधात फिरत आहेत, मात्र जंगलात शोध घेणाऱ्या तीन पथकांना बिबटय़ा चकमा देत आहे. अशातच बिबटय़ाने आज पहाटे बफर झोनमधील वायगाव येथील यादव लाटेलवार हा इसम पहाटे सहा वाजता शौचासाठी गावकुसावर जात असताना त्याच्यावर हल्ला केला. यात यादव गंभीर जखमी झाला. ही घटना वनविकास महामंडळाच्या मामलाच्या कक्ष क्रमांक ३८३ मध्ये घडली. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोवर बिबटय़ा जंगलात निघून गेला होता.
यादवला तातडीने चंद्रपूरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मान, कंबर व पाठीवर बिबटय़ांच्या नखाच्या जखमा झाल्या आहेत. सध्या प्रकृती ठीक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे गावात पुन्हा एकदा दहशत व भीतीचे वातावरण आहे.
तिकडे शार्प शूटर गुरुवारी रात्रीपासून किटाळी, भटाळी, पायली, चोरगाव, पदमापूर, आगरझरीच्या जंगलात बिबटय़ाचा शोध घेत आहेत. आज दिवसभर जंगल पिंजून काढल्यानंतरही हा बिबटय़ा आढळला नाही. त्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात सहा पिंजरे लावण्यात आले आहेत. आज रात्री किंवा उद्यापर्यंत हा बिबटय़ा जेरबंद होईल, असे वनखात्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबटय़ा व वाघाचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा, या मागणीसाठी भाजप चंद्रपूर तालुका ग्रामीण शाखेतर्फे २२ एप्रिल रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात २५ दिवसांत आठ लोकांचे बळी गेले आहेत. वन्यप्राण्यांचे सातत्याने होणारे हल्ले रोखण्यात वनखात्याला अपयश आले आहे. त्यामुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी २२ एप्रिल रोजी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस देवराव भोंगळे यांच्यातर्फे दिली.