अहिल्यानगरः जिल्ह्यातील कांद्याखालील क्षेत्र २ लाख २५ हजार ३४ हेक्टरवर गेले आहे. यंदा यामध्ये ५१ हजार ५४१ हेक्टरची विक्रमी वाढ झाली आहे. बागायत भागातील शेतकरीही नगदी पीक म्हणून कांद्याकडे वळलेले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाने अन्नप्रक्रिया उद्योगाखाली लिंपणगाव (ता. श्रीगोंदा) येथे ८ कोटी ६१ लाख रुपये खर्चाचे ‘कांदा क्लस्टर’ मंजूर केली आहे. या कांदा क्लस्टरमार्फत सुमारे १५० जणांना थेट तर सुमारे ८०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या महालक्ष्मी ग्रामलाईफ असोसिएशन’ या कंपनीमार्फत त्याची उभारणी सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकारातून कांदा क्लस्टरला उद्योग विभागाने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी दिली. राज्यातील कांदा क्लस्टरचा हा पहिला प्रयोग असल्याचे दवंगे यांनी सांगितले.

श्रीगोंद्यात कांद्याखालील क्षेत्र २५ हजार हेक्टरवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ ते ९ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून लिंपणगाव परिसरातील १५० शेतकऱ्यांना कांदा प्रक्रियेसाठी सौरउर्जेवर आधारित ‘ओनियन ड्रायर’ मंजूर केले. त्यातूनच कांदा क्लस्टरला चालना मिळाली. शेतकऱ्यांनी एकत्र येत महालक्ष्मी ग्रामलाईफ असोसिएशन ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर कांदा वाळवण, त्याची भुकटी करून विकण्याचे वैयक्तिक उद्योग सुरू केले. या प्रकल्पात आणखी दोनशे शेतकरी सहभागी होणार आहेत. कांदा क्लस्टरच्या माध्यमातून कांदा भुकटी, केक्स, बरिस्ता तयार करून त्याची निर्यात केली जाणार असल्याची माहिती कंपनीचे शेतकरी संचालक संदीप लांगोरे यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून या क्लस्टरसाठी ८० टक्के भांडवल उपलब्ध केले जाणार आहे तर कंपनी २० टक्के भांडवल उभारणी करणार आहे. क्लस्टरसाठी ग्रेडिंग, सॉर्टिंग, सामूहिक ड्रायर, पावडर निर्मितीसाठी यंत्रसामग्री खरेदी केली जाणार आहे.

अधिक माहिती देताना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दवंगे यांनी सांगितले की जिल्ह्यातील अन्नप्रक्रिया उद्योग वाढीसाठी नवनवीन क्लस्टर तयार उद्योग विभागाकडून तयार केले जात आहेत त्यामुळे रोजगार निर्मितीस मोठा संधी मिळणार आहे तर कंपनीचे शेतकरी संचालक लांगोरे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील तरुणांना विशेषतः महिलांना रोजगार, उद्योगाच्या संधी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होते. येथे जे पिकते त्यातूनच कांदा उत्पादनावर अभ्यास करून काय करता येईल यासाठी उद्योग केंद्राची अधिकाऱ्यांची भेट घेतली. क्लस्टर उभारणीला परवानगी मिळाल्याने ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

अधिक माहिती देताना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दवंगे यांनी सांगितले की, जिल्ह्यात यापूर्वी अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये ऑटो इंजिनिअरिंग, कोपरगाव व संगमनेरमध्ये गारमेंट, अहिल्यानगरमध्ये प्रिंटिंग व सुवर्ण कारागिरी असे ५ क्लस्टर उभारण्यात आले आहेत. याशिवाय कांदा क्लस्टर (८.६१ कोटी रु.), संगमनेरमध्ये अल्युमिनियम क्लस्टर (११ कोटी रु) व अळकुटी येथे (२६.११ कोटी रु. स्टील क्लस्टर उद्योग विभागाने मंजूर केले आहे.