लष्करी सेवेचे त्याला लहानपणापासून प्रचंड आकर्षण. त्याचे कारण लष्करी गणवेशातील शिस्त अन् दरारा तो वडिलांमुळे अनुभवत होता. त्याचे वडील ९ आसाम रायफल्समध्ये लष्करी अधिकारी. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मग त्याने जिद्दीने तयारी सुरू केली आणि आश्चर्याची बाब म्हणजे, लष्करात वडिल ज्या आसाम रायफल्समध्ये कार्यरत आहेत, तो थेट तिथे जाऊन धडकला. त्यासाठी भारतीय लष्करी प्रबोधिनीतील प्रशिक्षणादरम्यान केलेल्या कामगिरीबद्दल कांस्यपदक पटकाविले होते आणि आज तो ‘वैमानिक’ बनतानाही पुन्हा एकदा सवरेत्कृष्ट ठरला आहे.
शुक्रवारी येथील आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये ‘कोम्बॅक्ट एव्हिएटर्स’ प्रशिक्षण पूर्ण करताना सवरेत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘सिल्व्हर चित्ता’ चषकाने कॅप्टन अक्षय घोरपडे यांना गौरविण्यात आल्यानंतर आई नंदीता त्यांच्या प्रगतीचा पट मांडत होती. मूळचे मराठी परंतु, बंगळुरूमध्ये स्थायीक झालेले समस्त घोरपडे कुटुंबिय मुलाच्या कामगिरीला सलाम ठोकण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते.
या दीक्षांत सोहळ्यात घोरपडेसह तीन मराठी वैमानिकांची नांवेही झळकली. या निमित्ताने लष्कराच्या हवाई दलात ३२ वैमानिकांची तुकडी नव्याने समाविष्ट झाली आहे. दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल के. सुरेंद्रनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास तोफखाना स्कूलचे कमांडंट व्ही. के. नरूला, एव्हिएशन स्कूलचे कमांडंट ब्रिगेडिअर कमलकुमार उपस्थित होते. प्रत्यक्ष युद्धात लष्करी हवाई दलातर्फे केल्या जाणाऱ्या कार्यवाहीची चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. त्यात चित्ता, चेतक व ध्रुव हेलिकॉप्टर्सने सहभाग नोंदविला. सुमारे अर्धा तास चाललेल्या प्रात्यक्षिकांनी स्कुलच्या मैदानाला जणू रणभूमीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले.
भारतीय लष्करास हेलिकॉप्टर वैमानिकांची भासणारी कमतरता भरून काढण्यासाठी या स्कुलची स्थापना करण्यात आली आहे. लष्कराची हेलिकॉप्टर वैमानिकांची गरज पूर्ण करणारी ही देशातील एकमेव प्रशिक्षण संस्था. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना येथे प्रारंभी ‘बेसिक पायलट’ आणि नंतर ‘कोम्बॅक्ट एव्हीएटर्स’ हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. त्या अंतर्गत जवळपास ९० तासांच्या हवाई सरावाचा अनुभव दिला जातो. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३२ अधिकाऱ्यांची ही तुकडी लष्करी हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाली. वैमानिक म्हणून कार्यरत झालेल्या तुकडीत कॅप्टन अक्षय घोरपडे, कॅप्टन प्रशांत अंकोलेकर, सुमंत महाजन या तीन मराठी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ठ प्रशिक्षणाबद्दल कॅ़ विवेक कौशल, कॅ़  आशिष शर्मा व कॅप्टन रोहन सक्सेना यांनाही सन्मानित करण्यात आले.

‘वैमानिकांनी सुरक्षित उड्डाणाला प्राधान्य द्यावे’
आकाशातील सैनिक म्हणून कार्यरत राहताना लष्कराच्या हवाई दलातील वैमानिकांनी सुरक्षित उड्डाणास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन लेफ्टनंट जनरल के. सुरेंद्रनाथ यांनी केले. लष्करी हवाई दलात अत्याधुनिक हेलिकॉप्टर समाविष्ट होणार आहेत. आगामी काळात हे दल युद्ध विजयात महत्वाची भूमिका निभावेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Story img Loader