घोटी-भंडारदरा रस्त्यावर खेडजवळील एका वळणावर शनिवारी मध्यरात्री चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातात मयत झालेला तरुण हा माजी कॅबिनेट मंत्री जगन्नाथ पाटील यांचा पुतण्या आहे.
परेश पंढरीनाथ पाटील (३५) असे त्याचे नाव आहे. नितीन भरत भोसले (३६) व तुषार गौतम शेरे (रा. कल्याण, डोंबिवली) या मित्रांसमवेत ते स्विफ्ट डिझायर कारने भंडारदरा परिसरात फिरण्यासाठी आले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घोटीकडे परतत असताना हा अपघात घडला. परदेशवाडी शिवारात कडवा नदीजवळ एका वळणावर या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यालगतच्या कडवा नदीपात्रात कोसळली.
 अपघातात परेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर नितीन भोसले व तुषार शेरे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजल्यानंतर घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.