दुर्मीळ असे त्रिस्तरीय जंगल, विविध वनस्पतींच्या सुमारे साडेतीनशे प्रजाती, शेकरू, उडणारी खार हे दुर्मीळ प्राणी ही वैशिष्टय़े आहेत नुकताच वारसास्थळाचा दर्जा मिळालेल्या आलापल्लीच्या वनसंपदेची.. उडती खार आणि शेकरू या दुर्मीळ प्रजातींचे जतन आलापल्लीच्या जंगलात केले जात असून जैववैविध्य वारसा स्थळ म्हणून जाहीर झालेल्या आलापल्लीच्या जंगलाचे आता ‘पर्यटन’स्थळ होऊ नये, अशी अपेक्षा संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य जैवविविधता मंडळाने नुकताच आलापल्लीजवळ असलेल्या व ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ या नावाने परिचित असलेल्या सुमारे सहा हेक्टरमधील जंगलाला वारसास्थळाचा दर्जा जाहीर केला. त्यामुळे गेल्या साठ वर्षांपासून निसर्गाने सांभाळलेल्या या जंगलाच्या वैशिष्टय़ांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. राज्याच्या एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हय़ातील समृद्ध जंगल व त्यातले किमती सागवानाचे लाकूड सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याच जंगलातील आलापल्लीजवळचा हा सहा हेक्टरचा भाग ‘परमनंट प्रिझव्‍‌र्हेशन प्लॉट’ म्हणून विकसित करावा अशी कल्पना १९५२ साली कार्यरत असलेले तत्कालीन भारतीय वनसेवेतील अधिकारी मुजुमदार यांना सुचली. एखाद्या जंगलाचे रक्षण करून त्याला विकसित करायचे असेल तर कार्ययोजना आखून काम करावे लागते. मुजुमदार यांनी मात्र या कल्पनेच्या माध्यमातून निसर्गच जंगलाचे रक्षण व विकास कसा करतो हे अभ्यासण्याचे ठरवले. त्यानुसार हे सहा हेक्टर जंगल राखीव करण्यात आले. आज साठ वर्षांनंतर निसर्गानेच या जंगलाचे योग्य पद्धतीने संवर्धन केल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
जगात व विशेषत: भारतात आढळणारी जंगले बहुतांश एकस्तरीय असतात. हे जंगल मात्र त्रिस्तरीय आहे. लहान झाडे, झुडपे, नंतर २० ते २५ फुटांपर्यंत वाढणाऱ्या विविध प्रकारच्या वेली आणि शेवटी ५० ते ६० फूट उंच असलेली झाडे असे त्याचे स्वरूप आहे. जंगलातील सागवानाची झाडे बघून थक्क व्हायला होते. केवळ सागवानच्या जोडीला बिजा, शिसम, शिरस, ऐन, कळंब, हलदी असे अनेक प्रकारचे डेरेदार वृक्ष येथे आढळतात. देशातील कोणत्याही जंगलात वनस्पतीच्या ४० ते ५० प्रजाती आढळतात. या जंगलात हा आकडा ३५०पेक्षा जास्त आहे. येथील तेंदू, फावडाची झाडेसुद्धा बघण्यासारखी आहेत. साठ वर्षांनंतरसुद्धा हे जंगल दिमाखदार अवस्थेत आहे. वन खात्याने आगीचा प्रकार थांबवण्यापलीकडे या जंगलात काहीही केले नाही. केवळ निसर्गानेच हे जंगल सांभाळले. अशा समृद्ध जंगलात शेकरू व उडणाऱ्या खारी आढळतात. येथेही हे प्राणी दिसतात. देशातील पश्चिम व पूर्व घाटात न आढळणाऱ्या वनस्पतींच्या अनेक प्रजाती या जंगलात दिसून येतात, अशी माहिती गेल्या अनेक वर्षांपासून या जंगलावर संशोधन करणारे भारतीय वन सेवेतील अधिकारी रवीकिरण गोवेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. मध्यंतरी हे जंगल पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावर गोवेकर यांनी नाराजी व्यक्त केली. या जंगलाकडे संशोधक वृत्तीनेच बघायला हवे व त्यात सरसकट कुणालाही प्रवेश देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा