संगमनेर : मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सराला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी घडल्याने संगमनेर पोलिसांनी पुढील तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे.
सुमारे १७७ वर्षांची परंपरा असलेल्या गंगागिरी महाराजांचा वार्षिक सप्ताह सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी चालू आहे. याच दरम्यान रामगिरी महाराजांनी वरील वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. त्यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाला. काल सायंकाळी व्हॉट्सअॅपवर हा व्हिडीओ बघितल्यानंतर मुस्लिम समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वादग्रस्त वक्तव्याबाबत महंतांचा निषेध करत याबाबत गुन्हा दाखल करावा यासाठी काल मध्यरात्रीनंतर शहरातील तीन बत्ती चौकात मुस्लिम समुदाय जमा झाला. तेथे जोरदार घोषणाबाजी करत महामार्गही रोखून धरला. याची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व इतरांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. वैजापूर, येवला या ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल झालेले आहेत याची माहिती पोलिसांनी जमावाला दिली, परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर आज अहमद रझा युनूस शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मठाधिपतींविरोधात धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : “अजित पवार गुलाबी झालेत, आता म्हणे ते बारामती…”, संजय राऊतांची टोलेबाजी!
कोण आहेत रामगिरी महाराज..
अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्याला खेटून गोदावरी नदी किनाऱ्यावरील सराला बेट या ठिकाणी संत गंगागिरी महाराजांचा मठ आहे. लोकजागृतीच्या उद्देशाने साधारण दीडशे, पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी अखंड सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात. महाराष्ट्रभर मठाच्या अनुयायांचे मोठे जाळे आहे. गंगागिरी महाराज यांचे निधन झाल्यानंतर कीर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली. साधारण पंधरा वर्षांपासून रामगिरी महाराज मठाधिपती म्हणून कामकाज पाहत आहेत.