लोकसत्ता वार्ताहर
परभणी : जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबा विकास आराखडा समितीमध्ये काम करणार्या नगर पालिकेच्या कर्मचार्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह आठ जणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.
पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी नगर पालिकेतील कर्मचारी मधुकर दिवाण हे काम पाहतात. सदाशिव अण्णासाहेब गायकवाड हे त्यांचे सहायक म्हणून आठ महिन्यांपासून कार्यरत आहेत. सोमवारी (दि.१७) सकाळी अकरा वाजता सदाशिव गायकवाड (रा.शिवाजीनगर, पाथरी) हे साई मंदीर विकास आराखडा समितीचे दिवाण यांच्या कार्यालयात शासकीय काम करत असताना माजी आमदार दुर्राणी हे आपल्या कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी दुर्राणी यांनी गायकवाड यांना लाकडी फळीने मारहाण करण्यास सुरूवात केली.
तसेच इतर कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी १० ते १२ गाढव नगर पालिकेमध्ये आणले होते. त्यानंतर दुर्राणी हे मुख्याधिकार्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले व शासकीय कामात अडथळा केला. एका पावतीसाठी गायकवाड यांनी घेतलेली ५ हजार २०० रूपये रक्कम व अंदाजे १५ हजाराचा गायकवाड यांचा मोबाईल कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतला, त्यावेळी कार्यालयात अक्षय सदाशिव गायकवाड, अनिल गालफाडे हे कर्मचारी उपस्थित होते, असेही फिर्यादीत नमूद केले आहे.
सदाशिव गायकवाड यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून माजी आमदार अब्दुला खान लतीफ खान दुर्राणी, शहजाद बख्तियार खान, शेख इरफान शेख रज्जाक, रेहान मगबूल खान दुर्राणी, हमीद खान शेर खान, शेख नशीर शेख रौफ, अब्दुन इब्राहीम अब्दुल रशीद अन्सारी, शेख अल्ताफ शेख मुल्लाक या आठ जणांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पाथरी ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी महेश लांडगे हे करीत आहेत.