गुन्ह्यांचे कारनामे सुरूच; पुन्हा  पोलीस उपायुक्ताच्या निलंबनासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर : ७६ लाख रूपये किंमतीच्या कामाची निविदा मागे घ्यावी किंवा ११ लाखांची खंडणी द्यावी म्हणून महापालिका  कार्यालयातच एका ठेकेदाराला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे वादग्रस्त जिल्हाप्रमुख मनीष काळजे व त्यांच्या मोटारचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील संबंधित अभियंत्याची वर्तणूक संशयास्पद ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठेकेदार आकाश उत्तम कानडे (वय २३, रा. मानेगाव, ता. बार्शी) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मनीष काळजे व त्यांच्या मोटारचालकाविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३), ११५ (२), ३५१, ३५२ व त्यातील पोटकलमाखाली खंडणी, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा >>> सांगली : पोषण आहारात आढळला मृत सर्प

फिर्यादी आकाश कानडे हे ठेकेदार असून त्यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील भूमिगत गटारी बांधण्याच्या सुमारे ७६ लाख रूपये किंमतीच्या कामासाठी महापालिकेत निविदा भरली होती. या निविदा प्रक्रियेत मनीष काळजे यांनी काहीही थेट कारण नसताना रस दाखवला आहे. यात महापालिका प्रशासनातील काही अधिकारीही काळजे यांच्या दबावाखाली काम करतात. त्याचेच उदाहरण म्हणजे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील कनिष्ठ अभियंता दीपक रामचंद्र कुंभार यांनी ठेकेदार आकाश कानडे यांना सात रस्त्यावरील मनीष काळजे यांच्या कार्यालयात नेले. तेथे काळजे यांनी अक्कलकोड एमआयडीसी भागातील गटारीच्या कामाची भरलेली निविदा मागे घे म्हणून धमकावले. निविदा मागे घ्यायची नसेल तर या कामाची कार्यारंभ आदेश ७६ लाख रूपयांची आहे. त्याच्या १५ टक्क्यांप्रमाणे ११ लाख रूपये दे म्हणून मागणी केली. परंतु हा थेट खंडणीचा प्रकार असल्यामुळे ठेकेदार कानडे यांनी त्यास नकार दिला. तेव्हा चिडलेल्या काळजे यांनी कानडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करीत, तुला काम कसे मिळते ते बघतो. अधिका-यांना सांगून तुला अपात्र करतो, अशी धमकी दिली.

हेही वाचा >>> सातारा शिरवळ येथे आयटी हब, तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत – उदय सामंत

दरम्यान, दुस-या दिवशी ठेकेदार आकाश कानडे हे कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार यांच्यासह महापालिकेत सार्वजनिक आरोग्य विभागात सहायक आरोग्य अभियंता रामचंद्र पेंटर यांच्याकडे, आपल्या कामाची निविदा मंजूर झाली काय, अशी विचारणा करण्यासाठी आले असता ती माहिती मनीष काळजे यांना लगेचच समजली. त्यानुसर काळजे हे तात्काळ महापालिकेत येऊन फिर्यादी ठेकेदार कानडे व अभियंत्यांशी तावातावाने बोलायला सुरूवात केली. मात्र कानडे हे निविदा  मागे घ्यायला तयार नसल्याचे पाहून संतापलेल्या मनीष काळजे व त्यांच्या मोटारचालकाने ठेकेदार कानडे यांना मारहाण करायला सुरूवात केली. महापालिका कार्यालयात संबंधित  अभियंत्यांसमोर हा धक्कादायक प्रकार घडत असताना केवळ समजूत घालून मारहाण थांबविण्यात आली. मात्र काळजे यांनी ठेकेदार कानडे यांना शिवीगाळ व धमकी देणे सुरू ठेवले. निविदा मागे घे, नाही तर ११ लाख रूपये दे. अन्यथा तुला सोलापूरात राहू देणार नाही, अशी  धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे (वय ३३) यांच्याविरूध्द यापूर्वीही खंडणी, फसवणूक, मारहाण, सरकारी कर्मचा-यांना धमकावणे, सरकारी कामात अथडळा आणणे आदी गंभीर स्वरूपाचे पाचपेक्षा जास्त गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. विशेषतः शिसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्त झाल्यापासून त्यांच्याविरूध्द  फौजदारी गुन्हे नोंद आहेत. परंतु काळजे यांनी मात्र पोलीस अधिकारी आपल्याशी वितुष्ट ठेवून वागतात. ताज्या गुन्ह्याच्या प्रकरणातही त्यांनी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना दोष देत त्यांच्यावर निलंबानाची   कारवाई होण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against shiv sena shinde group district chief for threat and extortion contractor zws