राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे वडील माजी आमदार व्ही. एन. पाटील यांच्यावर अखेर गुरूवारी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी व्ही. एन. पाटील यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून त्याच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी व्ही.एन. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. विठ्ठल पाटील गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे वडील असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अखेर आज पाच दिवस उलटल्यानंतर मूर्तिजापूर पोलिसांनी विठ्ठल पाटील यांच्यावर ३२३ व ५४० या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दरम्यान, ही कारवाई पुरेशी नसल्याचे सांगत तक्रारदारांकडून नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात जाणुनबुजून संथगतीने तपास केल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा