सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत जंगलात राहणाऱ्या ११ कातकरी मुलांना मेंढपाळांना विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दोन ते २० हजार रुपयांना विकली गेलेली ही बालके मेंढपालनास मदत करीत रानोवनी फिरत आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी बुधवारी ११ मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. उद्या गुरुवारी राधानगरी प्रांत कार्यालयात या प्रश्नी बैठक होणार असून त्यामध्ये बालकांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला जाणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहर व जिल्ह्य़ाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राधानगरी धरणाची उभारणी केली. या कामासाठी त्यांनी कातकरी समाजातील लोक बोलाविले होते. धरणाचे काम झाल्यानंतर याच परिसरात ते राहिले. तालुक्याचे ठिकाण असलेल्या राधानगरीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर जंगलात त्यांची वस्ती आहे. वनविभागाच्या कडक कायद्यामुळे त्यांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे काम गमवावे लागले आहे. त्यामुळे असाहाय्य झालेल्या कातकरी लोकांनी पोटाची खळगी भरण्यासाठी ११ बालकांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन ते २० हजार रुपये इतक्या किमतीला या मुलांची विक्री करण्यात आली आहे. बालकांच्या गरिबी व अज्ञानाचा फायदा घेऊन दलालांनी निष्पाप मुलांची विक्री केली आहे.
विकण्यात आलेली ११ मुले रानावनात मेंढपाळाचे काम करीत आहेत. ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचे त्या वयात मेंढरे हाकण्याचे काम ही मुले करीत आहेत. दिवसभर मेंढपाळाचे काम करूनही त्यांना पोटभर खायला मिळत नसल्याची माहिती या बालकांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. प्रांताधिकारी समीर शिंगटे, सहायक कामगार आयुक्त बी.डी.गुजर, नायब तहसीलदार एच.के.यादव यांनी दिवसभर हालचाली गतिमान केल्या. ११ बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. याबाबत प्रांत शिंगटे म्हणाले, बालकांची विक्री केल्याची माहिती निनावी तक्रारीनुसार प्राप्त झाली. त्यानंतर बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांचे पुनर्वसन व पालकांना मदत करण्याबाबत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. अशाप्रकारचा विषय प्रशासनासमोर नव्याने आला असल्याने सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. गुरुवारी प्रांतकार्यालयामध्ये याप्रश्नी बैठक होणार असून त्यामध्ये पुनर्वसनाचे नियोजन केले जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2013 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात ११ मुलांना विकण्याचा प्रकार उघड
सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत जंगलात राहणाऱ्या ११ कातकरी मुलांना मेंढपाळांना विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दोन ते २० हजार रुपयांना विकली गेलेली ही बालके मेंढपालनास मदत करीत रानोवनी फिरत आहेत.
First published on: 07-02-2013 at 04:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case of saleing of 11 childrens in kolhapur