शहरातील पथदिवे योजनेतील गैरव्यवहाराबाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांनी दिले. आयुक्तांची मान्यता घेऊन तातडीने ही कारवाई करण्याचे आश्वासन मनपाचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी दिले.
मनपाच्या स्थायी समितीची मंगळवारी सभा होती. या सभेच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख व चंद्रकांत ठाकर यांनी स्थायी समितीच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारवरच ठिय्या आंदोलन केले. समितीची सभा सुरू होण्यापूर्वी शेख यांनी येथे ठिय्या दिला, त्यामुळे सभेसमोरील विषय बाजूला ठेवून डागवाले व सदस्य दीप चव्हाण, बाळासाहेब बोराटे, सचिन जाधव आदींनी शेख यांच्याशी चर्चा केली.
शेख यांनी या वेळी या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. या योजनेंतर्गत शहरातच एलईडी पथदिवे लावताना जुने पथदिवे व त्याचे साहित्य मनपात जमा करणे गरजेचे होते. या ठेकेदाराने शहरात १ हजार ६०० एलईडी पथदिवे बसवले आहेत, मात्र जुने सर्व साहित्य गायब असून ते मनपाकडे जमा करण्यात आलेले नाही. याबाबत संबंधितांचे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेख यांनी केला. हे कामही औरंगाबाद येथील ठेकेदाराने घेतले असून त्याने ते दुस-यास व दुस-यानेही तिस-यालाच हे काम दिले असून ही मनपाची फसवणूक आहे. त्याचे गांभीर्य व त्यातील गैरव्यवहाराची चौकशी करून मूळ ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेख यांनी केली.
स्थायी समितीच्या सभेत सुरुवातीलाच या विषयावर खडाजंगी चर्चा झाली. सदस्य दीप चव्हाण यांनी यातील अनेक गोष्टी उजेडात आणल्या. अंदाजपत्रकावरील चर्चेच्या वेळी यासंदर्भात संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला होता, त्याकडे लक्ष वेधून यात प्रशासनच त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. डागवाले यांनीही त्यास सहमती दर्शवत मागच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी बेहेरे यांनी आयुक्तांची मान्यता घेऊन ही कारवाई करण्याचे मान्य केले. ती न झाल्यास डागवाले यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेख यांनी या वेळी दिला.   

Story img Loader