नियोजित संत जगमित्र साखर कारखान्यासाठी मुंजा गित्ते या शेतकऱ्याची ३ हेक्टर १२ आर जमीन खरेदी केल्यानंतर ठरल्याप्रमाणे रक्कम दिली नाही, दिलेले धनादेश बँकेतून परत आले, तर मुलासह अन्य चौघांना नोकरीवरही घेतले नाही. याबाबत शेतकऱ्याने कारखान्याचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानंतरही दाद न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली. धनंजय मुंडे यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला.

मुंडे यांच्या संत जगमित्र कारखान्याला पुस (तालुका अंबाजोगाई) येथे परवानगी मिळाल्यानंतर कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीस सुरुवात झाली. तीन वर्षांपूर्वी तळणीचे शेतकरी मुंजा किसन गित्ते यांची पुस शिवारातील गट नं. ३६ मधील ३ हेक्टर १२ आर जमीन कारखान्याने खरेदी केली. जमिनीच्या मोबदल्यात १० लाख रुपये रोख, ४० लाख रुपयांचा धनादेश, गिते यांच्या मुलासह अन्य चौघांना या ठिकाणी नोकरी देण्याचा व्यवहार ठरला होता. व्यवहारापोटी मुंडे यांनी गिते यांना केवळ ८ लाख ८१ हजार २५० रुपये दिले.
जून २०१२ पासून २६ जुल २०१५ या कालावधीपर्यंत मुंडे व इतर दोघांनी ठरलेली रक्कम दिली नाही. ४० लाख रुपयांपोटी दिलेला धनादेशही बँकेत न वटता परत आला. मुलासह अन्य चौघांना नोकरी देण्यासही नकार देण्यात आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच गिते यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तक्रार न घेतल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. दोन महिन्यांपूर्वी या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने पोलिसांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते.

‘सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावापोटी गुन्हा’
संत जगमित्र कारखान्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या. त्यात मुंजा गित्ते यांचाही समावेश होता. गित्ते वगळता एकाचीही तक्रार नाही. गित्ते यांनाही सर्व पसे देण्यात आले. त्यांच्या जमिनीची एकूण रक्कम खरेदी खतात ४२ लाख रुपये असताना त्यांना ४० लाखांचा धनादेश कसा दिला, त्यांच्याकडे धनादेश कसा कोठून आला, हे माहीत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर आपण पोलिसांना चौकशीत पूर्ण सहकार्य केले. खरेदीखताचे सर्व दस्ताऐवजही दिले. गेल्या मार्चमध्येच कारखान्याच्या संचालकपदाचा आपण राजीनामा दिला. तत्पूर्वीचे सर्व व्यवहार पूर्ण केले. असे असताना जुने प्रकरण उकरून काढून सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावापोटीच जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

Story img Loader