राहाता : युनायटेड किंग्डम (युके) येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्त परिवाराची शिर्डीत फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली.५०० रुपये किमतीचे पुजाचे साहित्य तब्बल चार हजार रुपयांना विकुन या भाविकांची फसवणूक करण्यात आल्याने शिर्डी पोलिसांनी ४ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना आज सोमवारी शिर्डीत घडली.
योगेश मेहत्रे (पूर्ण नाव माहित नाही,. राहणार सावळीविहिर ता. राहाता), अरुण रघुनाथ त्रिभुवन (राहणार शिर्डी), सुरज लक्ष्मण नरवडे (पत्ता व नाव माहित नाही) प्रदीप राजेंद्र त्रिभुवन (राहणार लक्ष्मी नगर, शिर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.युनायटेड किंग्डम येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या बलदेव रामसेन, (वय ७३ राहणार मुळ- जालंदर, पंजाब हल्ली युनायटेड किंग्डम ) असे फसवणूक झालेल्या साईभक्ताचे नाव आहे. फिर्यादी बलदेव रामसेन हे आपल्या कुटुंबासह
शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सोमवारी आले असता त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलीशी एजंटने हारफुल, प्रसाद दुकानावर घेवून जात बळजबरीने रस्त्यावर अडवून नंदादीप फुल भांडार दुकानात घेऊन जाऊन पाचशे रुपयांचे किंमत असलेले प्रसाद, हार व फुले देऊन त्यांच्याकडून त्या बदल्यात ३ हजार ९५० रुपये घेऊन आम्ही ५ हजार रुपये घेऊन मंदिरात व्हीआयपी दर्शन करून देतो अशी दिशाभूल करून फिर्यादी बलदेव रामसेन यांची आर्थिक फसवणूक केली. बलदेव रामसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.यात फुल भांडार, दुकान जागा मालक, चालक व कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे.पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. शिर्डीत साईभक्तांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढे आता मूळ जागा मालकालादेखील आरोपी केले जाणार आहे.तसेच शिर्डीतील फूल भांडार दुकानांवर पूजा साहित्याचे दर पत्रक लावण्यासाठी बंधनकारक केले जाणार आहे.
अगदी लहान दुकान तीन ते चार हजार रुपये रोजाने भाड्याने दिली जातात. यामुळे भाविकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिस कठोर कारवाई करणार आहे.- रणजीत गलांडे ,पोलिस निरीक्षक, शिर्डी पोलिस ठाणे</strong>