आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातप्रकरणी जवळपास सहा महिन्यांनी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. 30 जणांचा मृत्यू झालेल्या या भीषण दुर्घटनेप्रकरणी मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत बसचालक प्रशांत भांबेड यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. 28 जुलै 2018 रोजी पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. बस आंबेनळी घाटात कोसळून विद्यापीठाचे 30 कर्मचारी जागीच ठार झाले होते. तर या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव बचावले होते.
बसचालक प्रशांत भांबेड हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच ०८ ई ९०८७) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होते. प्रशांत भांबेड यांनी निष्काळजीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आंबेनळी घाटात भीषण अपघात
दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी 28 जुलै 2018 रोजी पावसाळी सहलीनिमित्त महाबळेश्वरला निघाले होते. त्यावेळी आंबेनळी घाटात बस कोसळून 31 पैकी 30 जण जागीच ठार झाले. या सहलीसाठी त्यांनी विद्यापीठाची बस भाड्याने घेतली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही बस महाबळेश्वरच्या दिशेने जात होती. त्यावेळी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस आंबेनळी घाटात कोसळली.
प्रकाश सावंत देसाई आश्चर्यकारकरित्या बचावले
या अपघातात बसचा चेंदामेंदा झाला. बसमधील 31 पैकी 30 जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रकाश सावंत देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले. प्रकाश सावंत देसाई हे खोल दरीतून वर आले आणि त्यांनी मोबाइलवरुन विद्यापीठातील अधिकाऱ्यांना बस अपघाताची माहिती दिली.