अलिबाग– रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेल्या फेरारीला बैलगाडीच्या साह्याने बाहेर काढल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या प्रकरणाची दखल घेऊन रायगड पोलीसांनी आता फेरारी चालका विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समुद्र किनाऱ्यावर बेदरकारपणे वाहन चालवून पर्यटकांच्या जिवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> Year Ender : २०२४ या वर्षात महाराष्ट्रात पाहण्यास मिळालेली राजकीय नाट्यं कुठली?
फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया कार वाहनचालकाच्या अतिउत्साहामुळे रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतली. वाळूत रुतलेल्या फेरारीला स्थानिकांनी बैलगाडीच्या मदतीने अलगत बाहेर काढले. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज पोलीसांनी फेरारी चालकांचा शोध सुरू केला. समुद्र किनाऱ्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर फेरारी चालक बेदरकारपणे समुद्र किनाऱ्यावर गाडी चालवत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. यावेळी तिथे असलेल्या पर्यटकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता होती.
हेही वाचा >>> टोल कर्मचाऱ्यांकडून चौघांना बेदम मारहाण, संगमनेर मध्ये सर्वपक्षीय मोर्चा
पोलीसांनी सीसीटीव्ह फुटेजच्या आधारे गाडी नंबरचा शोध घेऊन वाहन चालकाचा शोध घेतला. तेव्हा ही फेरारी गाडी संभाजी नगर येथील अभिषेक जुगलकिशोर तापडीया यांच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलीसांनी वाहन चालका विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता, मोटर वाहन कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले या प्रकरणाचा तपास करत आहेत. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटतांना इतरांचे जीव धोक्यात येतील असे कृत्य करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणानंतर केले आहे.