लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिल्यानगर : गोल्डन रिट्रीबर जातीच्या कुत्रीच्या लहान पिल्लाच्या मृत्यूबद्दल शहरातील कोतवाली पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने केलेल्या मारहाणीत लहान पिल्लाचा मृत्यू झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती.

ही घटना बुधवारी घडली, तक्रार आल्यानंतर काल, गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शाबा दुलेख दारुवाले (रा. खिस्त गल्ली, जुना बाजार) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या विरोधात सुमय्या मतीन शेख (रा. खिस्त गल्ली, जुना बाजार) यांनी तक्रार दिलेली आहे. या दोन्ही महिला शेजारीशेजारी राहतात. सुलतान दुलेख शेख यांनी त्यांची गोल्डन रिट्रीबर जातीची कुत्री व तिची तीन लहान पिल्ले सांभाळण्यासाठी सुमय्या शेख यांच्याकडे दिली होती.

बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांनी गोल्डन रिट्रीबर जातीची कुत्री व तिची तीन पिल्ले घरासमोरील रस्त्यावर फिरण्यासाठी व खेळण्यासाठी सोडले होते. कुत्रीच्या चिकू नावाच्या पिल्लाला शाबा दुलेख दारूवाले हिने लाकडी काठीने मारहाण केली. सुमय्या शेख यांनी त्याबद्दल तिला जाब विचारला असता, ‘तूने मेरी कंप्लेंट की तो, तेरे बेटे को भी ऐसे ही मारुंगी’, अशी धमकी देत तिने त्या मृत पिल्लाला रस्त्यावर फेकून दिले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार संदीप पितळे करत आहेत.

संगमनेरमध्ये तर पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी एका कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. संगमनेरमधील एका डॉक्टरचा ‘रॉटविलर’ जातीचा कुत्रा रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या अंगावर धावून जात होता. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊन भीती निर्माण झाली होती. हा रॉटविलर कुत्रा अचानक अंगावर धावून आल्याने एक दुचाकीवरील महिलेचा अपघातही झाला. या अपघातग्रस्त महिलेनेच दिलेल्या फिर्यादीनुसार कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.